लखनौ : गंगा नदीची स्वच्छता आणि तिची जैवविविधतेच्या जागरूकतेसाठी सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या लाल पाठीची कासवे गंगा नदीत पुन्हा सोडण्यात आली आहेत. राज्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीत या प्रजातीची तब्बल २० गोड्या पाण्यातील कासवे पुन्हा आणली आहेत, असे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी बुधवारी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे, की उत्तर प्रदेशातील ‘हैदरपूर वेटलँड’ (पाणथळ) येथे २६ एप्रिलला २० कासवांना सोडण्यात आले. उत्तर भारतात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘रेड-क्राउन्ड रूफ्ड टर्टल’ (लाल पाठीची कासवे) या जातीची कासवे नियोजित वैज्ञानिक पुनर्वसन प्रयत्नांद्वारे नदीत पुन्हा सोडण्यात आले आहे.
गंगा नदीची जैवविविधता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. पाटील यांच्या मंत्रालयाच्या माहितीनुसार गंगेच्या मुख्य प्रवाहात गेल्या ३० वर्षांत या जातीचे पूर्ण वाढ झालेले एकही कासव दिसलेले नाही. कासवांच्या पुनर्वसन उपक्रमाचे श्रेय पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नमामी गंगे उपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाला दिले आहे.
‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स (लखनौ), वन विभाग आणि नमामी गंगे योजनेच्या संयुक्त मोहिमेत नामशेष होण्याच्या श्रेणीत असलेली ‘रेड -क्राइन्ड रुफ्ड टर्टल’च्या (लाल पाठीची कासवे) दहा जोड्या पाण्यात सोडल्या. ‘हैदरपूर वेटलँड’ ही हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्यातील बिजनोर गंगा बंधाऱ्याजवळ असून ‘युनेस्को’चा रामसर दर्जा मिळाला आहे. हा मानवनिर्मित तलाव १९८४ मध्ये तयार केला आहे.
पुनर्वसनासाठी कासवांची निवड
आरोग्य, लिंग आणि आकार, रूप किंवा रचना या वैशिष्ट्यांवर आधारित
सजलीकरण, ताण कमी करणे आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रात्री वाहतूक आदी गोष्टी विचारात घेऊन स्थलांतर
प्रत्येक कासवाच्या हालचलींचे निरीक्षण करण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग उपकरणे .
पुढील दोन वर्षांत कासवांचा माग काढला जाईल आणि त्यांचे निरीक्षण केले जाईल
या गोड्या पाण्यातील कासवांचे कवच ५६ सेमी लांब आणि २५ किलो वजनाचे असते
मादीच्या तुलनेत नर लहान असतात आणि त्यांची लांबी निम्मी असते
मार्च आणि एप्रिलमध्ये माद्या ११ ते ३० अंडी घालतात
अशी आहेत लाल कासवे
‘बाटागुर कछुआ’ हे जैविक नाव
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) च्या यादीत धोक्यात आलेली प्रजाती म्हणून या कासवांचा समावेश
आशियातील सर्वात धोक्यात असलेल्या कासवांच्या आणि गोड्या पाण्यातील कासवांच्या यादीतील ५० प्रजातींपैकी एक
भारतात फक्त चंबळ नदीतच या कासवांचा अधिवास
गेल्या ३० वर्षांपासून जगात इतरत्र त्यांच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही
नेपाळ आणि बांगलादेशमध्ये दिसल्याचे वृत्त आहे, परंतु त्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत
या कासवांचा भारतातील हा पहिलाच पुनर्वसनाचा प्रयत्न