RR vs MI : मुंबई सलग सहाव्या विजयासाठी सज्ज, राजस्थान रॉयल्स ‘हल्ला बोल’ करणार?
GH News May 01, 2025 07:08 PM

आयपीएल 2025 मध्ये आज गुरुवारी 1 मे रोजी राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर संजू सॅमसन याच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थानच्या कर्णधारपदाची सूत्रं सांभाळणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 11 वा सामना आहे. तसेच दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. मुंबईने या हंगामात एकूण 6 तर सलग 5 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला फक्त 3 सामन्यांमध्येच यशस्वी होता आलंय. त्यामुळे राजस्थानसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अटीतटीचा आणि ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे राजस्थान या सामन्यात पलटण विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघांची स्थिती

मुंबई इंडियन्सने या हंगामातील एकूण 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. पलटण 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईचा नेट रनरेट +0.889 असा आहे. तर राजस्थानला 10 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच विजय मिळवता आलाय. राजस्थान 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा -0.349 इतका आहे.

वैभव सूर्यवंशीसमोर अनुभवी गोलंदाजांचं आव्हान

राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने गेल्या सामन्यात गुजरात टायनन्स विरुद्ध शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वैभवने 35 चेंडूत विक्रमी आणि वेगवान शतक करण्याचा बहुमान मिळवला होता. वैभवने या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. वैभवने गुजरात विरुद्ध इशांत शर्मा, राशिद खान आणि इतर अनुभवी गोलंदाजांची धुलाई करत रेकॉर्ड ब्रेक खेळी साकारली होती. त्यामुळे हाच वैभव पलटणसमोर कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.

वैभवसमोर या सामन्यात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि विल जॅक्स या गोलंदाजांसमोर कशी बॅटिंग करतो आणि त्यांचा कसा सामना करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान राजस्थान आणि मुंबई दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. मुंबई विरुद्ध राजस्थान दोन्ही संघ आयपीएल इतिहासात एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबईने राजस्थानपेक्षा 1 सामना जास्त जिंकला आहे. मुंबईने 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 14 वेळा मुंबईवर मात केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.