
महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या आमदार, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणून भास्करराव जाधव यांची ओळख. पण आज एका लग्नानिमित्त त्यांच्यातील हळव्या माणसाचे रुप पहावयास मिळाले.
गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी त्यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती. तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तीने जाधव कुटुंबातील सर्वांचीच मन जिंकली. भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते.
गुरुवारी (1 मे 2025) सुप्रियाचे लग्न होते. सुप्रियाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून भास्कर जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं, सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने त्यांची पत्नी सुवर्णाताई आणि सून स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि रडू लागली, तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, “सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या”. असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.