मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शीचा थरारक अनुभव
Marathi May 01, 2025 09:27 PM

श्रीनगर: पहलगम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर गेल्या 8 दिवसांपासून तपास यंत्रणाकडून कसून तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शी पर्यटक आता पुढे येऊन घडलेल्या घटनेचा थरारक अनुभव सांगत आहेत. जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत यांनी हल्ल्याच्या आदल्या दिवशी रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांशी संवाद झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आज एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून त्यांची दीड तास चौकशी करण्यात आली. दुसरीकडे पहलगाम हल्ल्यावेळचा आणखी एक प्रसंग पर्यटकाने सांगितला आहे. पश्चिम बंगालमधील एका महिलेनं धक्कादायक खुलासा केला आहे. दशतवाद्यांनी आम्हाला थांबविण्याचा प्रयत्न केला, बसा मॅगी आणि मोमोज खावा… असं दहशतवाद्यांनी या पर्यटकांना म्हटलं होतं. विशेष म्हणजे जालन्यातील (Jalna) आदर्श राऊत यांनी देखील पोलिसांना माहिती देताना मॅगी स्टॉलचा फोन नंबर दिला आहे.

पश्चिम बंगालमधील पूर्वाशा नामक महिलेनं पहलगाम हल्ल्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. तसेच, हल्ल्यातील दहशवाद्यांनी त्यांच्याशी संवादही साधल्याचे तिने म्हटले. पश्चिम बंगालमधील 10 ते 12 जणांचा ग्रुप काश्मीर फिरायला गेला होता. 21 एप्रिल रोजी आम्ही काश्मीरला पोहोचलो आणि 22 तारखेला बैसरण येथील पहलगाम फिरायला गेलो. जेव्हा हा हल्ला झाला, त्याच्या काही तास अगोदरच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आम्ही तिथे मजामस्ती करत असताना, रिल्स बनवता असताना आमची एक मैत्रिण खाली पडली. तिच्या अंगाला चिखल लागला होता. याशिवाय घोडेवाल्याने अधिकच्या 1 तासासाठी प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये अधिक लागतील असे सांगितले. त्यामुळे, आम्ही तिथून निघण्याचे ठरवले. त्याचवेळी, 4 ते 5 जणांनी आमच्याजवळ येऊन आम्हाला घेरलं, अरे तुम्ही कुठे चाललात अजून खूप काही बघायचं बाकी आहे, असे त्यांनी म्हटले. जबरदस्तीने ते आम्हाला थांबवत होते. तुम्ही चहा प्या, मॅगी खावा, आम्ही मोमोज बनवतो ते खावा. अजून खूप फिरायचं आहे, बघायचं आहे, असे त्या लोकांनी या पर्यटकांना म्हटलं. ते आम्हाला अडवून ठेवत होते, पण माझ्या दिदीने जायचा हट्ट् केला तेव्हा त्यांनी आम्हाला जाऊ दिले.

आम्ही तिथून निघाल्यानंतर काही वेळातच गोळीबार झाल्याचा आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला तो रायडिंगचा आवाज वाटला, पण गोंधळ उडाला होता, दहशतवादी हल्ला झाल्याचं लोक सांगत होते. त्यामुळे, आम्हीही तातडीने टॅक्सी स्टँडकडे निघालो. तेव्हा आर्मीचे जवान आणि रुग्णावाहिका धावताना आम्ही पाहिल्याचा थरारक अनुभव पूर्वाशा हिने एबीपीशी बोलताना सांगितला. दरम्यान, जालन्यातील आदर्श राऊत यांनीही मॅगीवाल्याचा उल्लेख आपल्या अनुभवात केला आहे. तसेच, याबाबत एनआयएला ईमेलद्वारे आधीच माहिती पाठवली होती, संभाषण आणि इतर बाबींचा समावेश या माहितीतून करण्यात आला आहे.

हेही वाचा

घरकाम करणाऱ्या लेकीची पाठवणी, भास्कर जाधवांच्या डोळ्यात पाणी; नात्याचा क्षण पाहून ग्रामस्थही गहिवरले

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.