आयपीएलचा 18 वा मोसम ऐन रंगात असताना क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीकडून आगामी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेसाठी मुख्य तारखा आणि ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेत एकूण 12 संघांमध्ये 24 दिवसांमध्ये 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 12 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंडकडे आहे. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. एकूण 7 ठिकाणी हे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 5 जुलैला लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये अंतिम सामना फार पडेल. आयसीसीने 1 मे रोजी सोशल मीडियावरुन याबाबतची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, लॉर्ड्स व्यतिरिक्त बर्मिंगघम येथील एजबेस्टन, साऊथमपटन येथील हँपशायर बाऊल, लीड्समधील हेडिंग्ले, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडमध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत.
टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 8 संघांनी टी 20 वर्ल्ड कपमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर उर्वरित 4 संघ हे येत्या वर्षातील क्वालिफायर स्पर्धेतून निश्चित होतील.
आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या मुख्य तारखा जाहीर
12 संघ आणि 2 गट
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 12 संघांची 6-6 नुसार 2 गटात विभागणी केली जाणार आहे. या संघांमध्ये साखळी फेरीनंतर बाद फेरीचा थरार रंगेल. तर त्यानंतर अंतिम सामन्यातून विजेता निश्चित होईल. न्यूझीलंड क्रिकेट टीम गतविजेता आहे. न्यूझीलंडने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात केली होती. वूमन्स टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही टी 20 वर्ल्ड जिंकता आलेला नाही. टीम इंडिया 2020 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात खेळली होती. मात्र तेव्हा टीम इंडिया अपयशी ठरली. त्यामुळे महिला टीम इंडियाने क्रिकेट चाहत्यांची ही प्रतिक्षा संपवावी, अशी आशा असणार आहे.