कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील 51 व्या सामन्यात पाहुण्यात सनरायजर्स हैदराबादसमोर 225 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. गुजरातसाठी शुबमन आणि जोस या दोघांव्यतिरिक्त ओपनर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही योगदान दिलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत 205 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. त्यामुळे आता हैदराबादला हा सामना जिंकायचा असले तर विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. हैदराबादने याआधी असं करुन दाखवलं आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज झंझावाती खेळी करुन प्लेऑफमधील आव्हान कायम राखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरातसाठी पहिल्या 4 फलंदाजांनी धमाकेदार बॅटिंग केली. त्यामुळे गुजरातला 200 पार मजल मारता आली. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. गिलने 38 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 76 धावा केल्या. गिलच्या या खेळीत 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. गिलनंतर बटलर याने सर्वात जास्त धावा कुटल्या. बटलरने 37 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह 64 रन्स केल्या.
त्याआधी ओपनर साई सुदर्शन याचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. साईने 23 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने 16 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. तर त्यानंतर शाहरुख खान आणि राहुल तेवतिया या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर गुजरातकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर झीशान अन्सारी आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.