आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू’, असे म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीत सुरू झाला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून, शनिवारी (ता.३) सकाळी भक्तीच्या ‘ज्ञानकुंभा’ला प्रारंभ होणार आहे.
सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी निरनिराळ्या सुविधा देण्यासाठी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, आळंदीकर ग्रामस्थ भाविकांना सुरक्षा, सुविधा देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
देवस्थानच्या वतीने दहा एकरांहून अधिक पटांगणात भव्य मंडप उभारला आहे. येथे पारायण सोहळा, अन्नदान, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध केली आहे. याचबरोबर भाविकांच्या निवासाचीही व्यवस्था असणार आहे. या व्यतिरिक्त सुमारे अडीचशे खोल्या आणि पन्नास हॉल उपलब्ध केले आहेत.
विश्वस्त चैतन्य महाराज कबीर म्हणाले, ‘‘उन्हाळा असल्याने देवस्थानकडून भाविकांसाठी थंड पाण्याची सुविधा देण्यात येत आहे. सोबतच नाष्टा, जेवण आणि निवासाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. पहिल्या आणि शेवटच्या दिवशीची अन्नदान सेवा आळंदीकरांच्या वतीने केली जाणार आहे. पारायण-कीर्तन मंडपात उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी दीडशे कूलर, पंख्यांची व्यवस्था आहे. स्वकाम सेवा मंडळाचे चारशे स्वयंसेवक, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चारशे विद्यार्थी आणि विठ्ठल महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अडीचशे वारकरी स्वयंसेवकाचे काम करतील. याचबरोबर आळंदीकरांनी नियोजनासाठी तेरा समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यात चारशेहून अधिक स्वयंसेवक आहेत.’’
आळंदीतील सोहळ्यासाठी गुरुवारी (ता.१) रात्री पंधराशे भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. पारायणासाठी आतापर्यंत पाच हजार भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच आळंदी पंचक्रोशीतील पाच हजार भाविक पारायणाला बसणार आहेत. सहभागी प्रत्येकाला देवस्थानकडून मोफत ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ पुस्तिका दिली जाणार आहे.
- योगी निरजंननाथ, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान
सोहळ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन रामभाऊ महाराज राऊत (ता. ३ ते ५ मे), संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र चिंतन चैतन्य महाराज देगलूरकर (ता.६ ते ८), संत नामदेव महाराज चरित्र चिंतन चंद्रशेखर महाराज देगलूरकर (ता. ९) यांच्या रसाळ वाणीतून होणार आहे. शुक्रवारी (ता.९) रात्री सातच्या सुमारास दिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी गंगापूजन सोहळा व दीपोत्सव, फटाक्यांच्या आतषबाजी होणार आहे. तसेच राज्यातील नामवंत कीर्तनकारांची प्रवचने आणि कीर्तने होणार आहेत.
- डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळाप्रमुख, आळंदी देवस्थान