तन्वी मुंडले आणि सिद्धार्थ मुंडले
भावाचं आणि बहिणीचं नातं म्हणजे केवळ भातुकलीतली राखी किंवा लहानपणीची भांडणं नाहीत, तर हे नातं अनुभवांच्या आणि वेळेच्या धाग्यांनी विणलेलं असतं. तन्वी आणि सिद्धार्थ मुंडले यांचं नातं म्हणजे याच भावबंधाचा सुंदर नमुना. केवळ भाऊ-बहीण म्हणून नाही तर जीवाभावाचे मित्र, एकमेकांचे आधारवड बनून ते आयुष्यात एकमेकांची साथ देत आले आहेत.
तन्वी म्हणते, ‘‘माझा दादा हा केवळ भाऊ नाही, तर माझा बालपणापासूनचा बेस्ट फ्रेंड आहे. आमचं नातं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदललं, अधिक गहिरं होत गेलं.’’ बाबांच्या निधनानंतर सिद्धार्थनं घराची जबाबदारी उचलत तन्वीसाठी वडिलांची जागा घेतली. ती म्हणते, ‘‘मी माझ्या मनातले प्रत्येक विचार त्याच्याशी शेअर करू शकते. तो एक सॉलिड व्यक्तिमत्त्व आहे, विचारांनी खूप सॉर्टेड आणि स्टेट फॉरवर्ड. तो इतरांना नीट समजावून मुद्दा मांडतो, जे मला अजूनही अवघड जातं.
मला अजून लक्षात आहे, मी पहिल्यांदा शूटसाठी ठाण्यात गेले होते, तेव्हा मला झोप पूर्ण मिळावी म्हणून तो सकाळी लवकर उठून गिझर लावून गरम पाण्याची बादली तयार ठेवायचा. रात्री उशिरा घरी यायचे तेव्हा, मी काही खाणार आहे का, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचा. एवढं तर त्यानं स्वतःसाठीही कधी केलं नसेल. तो खूप केअरिंग आहे; पण फिटनेसच्या बाबतीत अजून काम करणं बाकी आहे. प्रयत्न करतो; पण चिकाटी ठेवत नाही. मी प्रचंड फिटनेस फ्रीक आहे, त्यामुळे याबाबतीत आम्ही अगदी विरुद्ध आहोत.’’
सिद्धार्थच्या दृष्टिकोनातून बघितल्यावरही हे नातं तेवढंच खास आहे. तो सांगतो, ‘‘ती माझी केवळ बहीण नाही, तर सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आम्ही एकमेकांची खूप मस्करी करतो, नावं ठेवतो; पण त्याचवेळी एकमेकांचा अभिमानही वाटतो. ती तिच्या कामात खूप फोकस्ड आहे. तिला नेमकं काय करायचंय, हे पूर्ण स्पष्ट असतं. तिचं मेंटली स्ट्रॉंग असणं मला खूप आवडतं.
‘‘तिचा एकच प्रॉब्लेम आहे - ती खूप भोळी आहे. कोणीही तिला सहजपणे विश्वासात घेऊन काहीही सांगू शकतं. तिला कोणीही फसवू शकतं. तिच्या क्षेत्रात एवढं भोळेपणा चांगला नाही. म्हणून आम्हा सगळ्यांना काळजी वाटते.’’
एक किस्सा आठवत तो म्हणतो, ‘‘मी जेव्हा माझ्या प्रेमाबद्दल तन्वीला सांगितलं, तेव्हा तिनं मला एक मैत्रीण म्हणून खूप समजून घेतलं. घरी सांगण्याची वेळ आली, तेव्हा तिनेच पुढाकार घेऊन सगळ्यांना समजावलं. त्यामुळे गोष्ट सहज झाली.’’
त्यांचं नातं कोणत्याही एका चौकटीत बसत नाही. हे फक्त भाऊ-बहीण म्हणून नाही तर एकमेकांचे support system म्हणून टिकलेलं, भरलेलं आणि प्रगल्भ झालेलं नातं आहे. हे नातं म्हणजे केवळ रेशीमधाग्याचं नव्हे, तर विश्वासाच्या, प्रेमाच्या आणि मित्रत्वाच्या गाठीने घट्ट बांधलेला एक सुंदर बंध आहे.
(शब्दांकन : मयूरी गावडे)