पंचांशी नेमका काय वाद झाला? सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिल व्यक्त झाला
GH News May 03, 2025 04:05 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक गमवल्याने गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. गुजरात टायटन्स समोर बलाढ्य लाइनअप असलेला संघ पाहिल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याचा निश्चय केला. त्या प्लानिंगनुसार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सुरुवात केली. या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही सनरायझर्स हैदराबादला गाठता आलं नाही. हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा केल्या. तसेच 38 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. पण या सामन्यात चर्चा झाली ती कर्णधार शुबमन गिलची.. एकदा त्याला रनआऊट दिल्याने पंचांशी वाद घालताना दिसला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या डावात अभिषेक शर्मा फलंदाजी करताना एलबीडब्ल्यूसाठी डीआरएस रिव्ह्यूवरून पंचांवर वैतागलेला दिसला.

सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘माझी पंचांशी थोडीशी चर्चा झाली, कधीकधी खूप भावना असतात. कारण तुम्ही तुमचे 110 टक्के देता. त्यामुळे काही भावना असण्याची शक्यता असते.’ दुसरीकडे, गुजरात टायटन्सने या सामन्यात सर्वात कमी निर्धाव चेंडू घालवले. त्याबाबतही शुबमन गिलने भावना व्यक्त केल्या. ‘निश्चितच असे नियोजन केले नव्हते. फक्त एकच चर्चा झाली की आपण आतापर्यंत खेळत असलेल्या खेळाचा प्रयत्न करूया. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणे सोपे नाही पण मी, साई आणि जोस ज्या पद्धतीने खेळतो, त्यावरून आम्हाला वाटते की आम्हाला स्कोअरबोर्ड कसा टिकवायचा याची समज आहे. आम्ही सर्वजण धावांसाठी उत्सुक आणि भुकेले आहोत आणि संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो.’

‘प्रत्येक सामन्यापूर्वी आम्ही क्षेत्ररक्षणाबद्दल बोलतो, आम्ही आतापर्यंत सरासरी आहोत पण आज आम्ही ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले त्यावर समाधानी आहोत. प्रत्येकजण त्यात सहभागी होत आहे, या मैदानांवर बचाव करताना पर्याय असणे नेहमीच चांगले असते.’ असं शुबमन गिल पुढे म्हणाला. दरम्यान, गुजरात टायटन्सने या विजयासह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. तर सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.