जम्मू : पाकिस्तानच्या सीमेवरील भारतविरोधी कुरापती सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांतील गावांत पाकिस्तानी रेंजर्सकडूनकडून करण्यात आलेल्या गोळीबारास आज भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून आज सलग आठव्या दिवशी गोळीबार करण्यात आल्याने सीमावर्ती भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि न्यायवैद्यकचे एक पथक शुक्रवारी घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर दहशतवादी हे दक्षिण काश्मिरमध्येच असल्याचे समजते, त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात रसद आणि अन्य साहित्य असावे असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
या गोळीबारामुळे सीमावर्ती गावांत राहणाऱ्या गावकऱ्यांनीही सुरक्षितस्थळी धाव घ्यायला सुरूवात केली असून अचानक तोफगोळ्यांचा मारा सुरू झालाच तर त्याचा सामना करण्यासाठी वैयक्तिक बंकरची उभारणी केली जात आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी १ आणि २ मे रोजी कुपवाडा, बारामुल्ला, पूँच, नौशेरा आणि अखनूरमधील भारतीय गावे आणि चौक्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरू होताच भारतीय लष्करानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
पाकिस्तानकडून सुरूवातीला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले त्यानंतर पूँच सेक्टरमधील चौक्यांच्या दिशेनेही गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर अशाच प्रकारचा गोळीबार जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्येही झाला होता. राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमधील अनेक चौक्यांवर गोळीबार करण्यात आल्यानंतर परगवाल सेक्टरमध्येही अशाच प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. गोळीबाराच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांविषयक महासंचालकांची बैठक पार पडली होती पण त्यानंतर गोळीबाराचे हे सत्र सुरूच होते.
हवाई दलाचा ‘गंगा एक्स्प्रेस वे’ वर सरावशहाजहाँपूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून युद्ध सज्जतेच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. नौदलानंतर हवाई दलानेही उत्तर प्रदेशातील गंगा एक्स्प्रेस वेवरील ३.५ किमीच्या पट्ट्यात ‘लँड-अॅन्ड-गो’ ही युद्ध सज्जतेची चाचणी सुरू केली. लढाऊ विमाने एक्स्प्रेस वेवर उतरविली जात आहेत. या एक्स्प्रेस वे वर दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा लढाऊ विमाने उतरविता येतात. हे या महामार्गाचे अनोखे वैशिष्ट्य आहे.
गंगा एक्स्प्रेसवेरील लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरच्या कसरती पाहण्यासाठी स्थानिकांसह आसपासच्या परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यांच्यासाठी हा रोमांचक क्षण होता. या सरावात हवाई दलाकडून लढाऊ विमानांची कमी उंचीवरून उडण्याची तसेच दिवसा व रात्री लॅंडिंग तसेच टेक ऑफ करण्याची क्षमता तपासली जाईल. या सरावाच्या यशामुळे आपत्कालीन परिस्थितीत गंगा एक्स्प्रेस वेचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करण्याची क्षमताही सिद्ध होईल. तसेच हवाई दलाची क्षमता वृद्धिंगत होईल, असा विश्वास उत्तरप्रदेशच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ संरक्षण अधिकारीही या सरावाला उपस्थित आहेत. हवाई दलाच्या या सरावादरम्यान सुरक्षा व देखरेखीसाठी महामार्गावर २५० पेक्षा अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
रात्रीही विमाने उतरणारआपत्कालीन परिस्थितीत धावपट्टी म्हणून वापरण्याच्या या महामार्गाच्या क्षमतेचेही प्रदर्शन करण्यात येत आहे. दिवसा व रात्रीही धावपट्टीसारखा वापर केला जाऊ शकणारा हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच महामार्ग आहे. या महामार्गापूर्वी लखनौ-आग्रा आणि पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर आपत्कालीन परिस्थितीत हवाई दलाकडून लॅंडिंगच्या दिवसा चाचण्या घेतल्या जात असत. या महामार्गाचे काम अद्याप सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन धावपट्टी असणारा गंगा एक्स्प्रेस वे हा उत्तर प्रदेशातील चौथा महामार्ग ठरेल. मात्र, रात्रीही विमाने उतरण्याची सोय असणारा हा पहिलाच एक्स्प्रेस वे असेल.
राफेल
मिराज-२०००
सुखोई-३० एमकेआय
मिग-२९
जग्वार
सी-१३०जे
एएन-३२
एमआय-१७
शाहबाज शरीफांचे अकाउंट बंद
पाकिस्तानला आणखी दणका देत भारत सरकारने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अधिकृत यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले आहे. याशिवाय बाबर आझम, हारिस रौफ, मोहंमद रिझवान आणि शाहीद आफ्रिदी यांचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानने दोन दिवसांनंतर आज वाघा सीमा खुली केली, ही सीमा ३० एप्रिल रोजी बंद करण्यात आली होती यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक येथे अडकून पडले होते.