मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (NCP Ajit Pawar) पक्षाच्यावतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. हे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिलं आहे. मात्र हे तिन्ही मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता धूसर आहे, म्हणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घरी जाऊन लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र दिनानिमित आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याकडे महाविकास आघाडीशी संबंधित माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. तर महायुतीशी संबंधित माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे. आज माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मुंबईत आहेत. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर जाणं टाळलं आहे.
शरद पवारांना आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न एबीपी माझाने विचारला असता संबंधित कार्यक्रम एका महायुतीशी संबंधित पक्षाचा आहे. त्यामुळे त्यांच्या स्टेजवर जाण्याचा सवाल उपस्थित होतं नाही, असं उत्तर पवारांकडून देण्यात आलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीशी संबंधित पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळवलं आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी अद्याप होकार अथवा नकार देखील कळवलेला नाही तर उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुसरीकडे महायुतीशी संबंधित असणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनारायण राणे, अशोक चव्हाण आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=IKI4Z35CAPM
अधिक पाहा..