Sunil Tatkare On Ajit Pawar CM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मे रोजीच्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदावर केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मला गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतंय पण कुठे जमतंय, असं अजित पवार म्हणाले होते. असे असताना याच मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
सुनिल तटकरे मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्रिपद यावर थेट भाष्य केलं. “अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेतलेली आहे. मात्र अजित पवार यांनी पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी हे स्वप्न आहे, असं सुनिल तटकरे यांनी बोलून दाखवलं. तसेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर असे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन आणि विचारांशी तडजोड न करता आम्ही सत्तेत सहभागी झालो. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना वाटलं की अजित पवार संपले. मात्र आम्हाला विश्वास होता. विधानसभा निवडणुकीत परिमाण वेगळा दिसला. अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिकवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा समतोल विकास केला, अशी स्तुतीसुमनंही तटकरे यांनी उधळली.
तसेच पुढे बोलताना देवेंद फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काम करताना साथ मिळते आहेच. पण आपण सगळे मिळून अधिक ताकद वाढवू आणि सरकार अधिक उत्तम चालेल यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
अजित पवार मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं होतं. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं अजित पवार म्हणाले होते.