भंडारा : जिल्ह्यात शनिवारी तीन ठिकाणी वीज कोसळली. यात भंडारा तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला तर तुमसर तालुक्यात दोन जनावरे ठार झाली आहेत. मृत युवकाचे नाव रवींद्र मितााराम खंगार (वय ४०, रा. तिड्डी) असे आहे.
भंडारा तालुक्यात शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला. यावेळी तिड्डी शिवारात काम करत असलेला रवींद्र खंगार हा वैनगंगा नदीच्या काठावरील झाडाखाली बसलेला होता. त्याच झाडावर वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला.
त्याला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे आणण्यात आले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तसेच तुमसर तालुक्यात रोंघा येथे दुपारी तीन वाजता वीज कोसळून गुरुदेव सोनवाने यांचा बैल ठार झाला तर, मिटेवानी येथे वीज कोसळून चंदन बोपचे यांच्या मालकीची म्हैस ठार झाली आहे.