KKR vs RR : कोलकाताचा शेवटच्या बॉलवर राजस्थानवर 1 रनने सनसनाटी विजय, रियान परागची खेळी व्यर्थ
GH News May 04, 2025 11:07 PM

कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्समध्ये राजस्थान रॉयल्सवर शेवटच्या बॉलवर 1 धावाने सनसनाटी विजय मिळवला आहे. केकेआरने राजस्थानला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानसाठी कर्णधार रियान पराग याने 95 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची गरज होती. तेव्हा इमपॅक्ट प्लेअर शुभम दुबेने फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावा हव्या होत्या. मात्र वैभव अरोरा याने अचूक बॉल टाकला. त्यामुळे राजस्थानच्या शुबम दुबे आणि जोफ्रा आर्चर या जोडीला 1 धावच करता आली. जोफ्रा आर्चर दुसरी धाव घेताना नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. कोलकाताने अशाप्रकारे शेवटच्या बॉलवर 1 धावेने विजय मिळवला. राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावांपर्यंतच पोहचता आलं.

केकेआरसाठी राजस्थान विरुद्धचा हा करो या मरो असा सामना होता. केकेआरने शेवटच्या चेंडूवर यश मिळवलं. केकेआरने यासह 11 व्या सामन्यात पाचवा विजय मिळवला आणि प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. तर राजस्थानचा हा 12 सामन्यांमधील नववा पराभव ठरला. राजस्थानचं प्लेऑफमधील आव्हान याआधीच संपुष्टात आलं आहे.

कोलकाताने 207 धावांचा पाठलाग करायला आलेल्या राजस्थानला झटपट 5 झटके दिले. वैभव सूर्यवंशी 4 आणि यशस्वी जयस्वाल याने 34 धावा केल्या. तर कुणाल सिंह राठोर, ध्रुव जुरेल आणि वानिंदु हसरंगा या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राजस्थानची 7.5 ओव्हरमध्ये 5 आऊट 71 अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे राजस्थान सामन्यात कायम राहिली.

रियान आणि शिमरॉन या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 92 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शिमरॉन हेटमायर 23 बॉलमध्ये 29 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर निर्णायक क्षणी रियान परागही आऊट झाला. रियानने 45 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरसह 95 रन्स केल्या. रियान आऊट झाल्याने राजस्थान बॅकफुटवर गेली आणि केकेआरने सामन्यात कमबॅक केलं.

केकेआरचा सनसनाटी विजय

शेवटच्या ओव्हरचा थरार

रियान आऊट झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर शुबम दुबे आणि जोफ्रा आर्चर या जोडीने राजस्थानला शेवटपर्यंत सामन्यात कायम ठेवलं. आता राजस्थानला 20 व्या ओव्हरमध्ये 22 धावांची गरज होती. राजस्थानने पहिल्या 2 चेंडूत 3 धावा केल्या. त्यानंतर शुबमने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलवर अनुक्रमे 6,4 आणि 6 ठोकत सामन्याची रंगत वाढवली. आता राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर अवघ्या 3 धावांची गरज होती. शुबम फटके मारत असल्याने राजस्थानला विजयाची आशा होती. तर बॉलर वैभव दबावात होता. मात्र वैभवने यॉर्कर टाकत अवघी 1 धाव करुन दिली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चर रन आऊट झाला. केकेआरने अशाप्रकारे 1 रनने विजय मिळवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.