सागर निकवाडे
नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत तारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण महामार्गावरून गेलेल्या विद्युत तारा लोंबकळलेल्या असतात. यामुळे दुर्घटना देखील घडल्या आहेत. अशीच घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली असून महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॉलाचा विद्युत तारांना स्पर्श झाला. यामुळे संपूर्ण ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने चालकाचा यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यावरती सीमेवर असलेला जिल्ह्यातील आश्रवा गावाजवळ सदरची घटना शनिवारी घडली आहे. यात पंजाबहून येणारा एक ट्राला आश्रावा गावातील गणपती मंदिरा जवळून जात होता. त्यावेळी ट्रालाचा मागचा भाग वरून गेलेल्या विद्युत तारेला लागला आणि ट्रालामध्ये विद्युत प्रवाह उतरला. यामुळे चालकाला जोराचा बसला. या भीषण अपघातात ट्रालाचा चालक जागीच मृत झाला.
विद्युत प्रवाहामुळे कॅबिनमध्ये लागली आग
अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या आश्रवा गावाजवळील मंदिरा समोरून ट्राला जात असताना मागचा भाग विद्युत तारेला लागला. यामुळे तात्काळ आग लागली आणि ट्रालाची केबिन जळू लागली. यावेळी चालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा ट्रकच्या कॅबिनमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नागरिक देखील हतबल
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि वीज वितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वीज पुरवठा बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न झाला. पण तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. मृत चालक हा पंजाब राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून घटना घडली यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक देखील काहीच करू शकले नाही. दरम्यान मंदिराजवळ असलेल्या विद्युत तारांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.