इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ५३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रविवारी (४ मे) पार पडला. ईडन गार्डन्सवर पार पडलेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला.
अगदी सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अवघ्या एका धावेने विजय मिळवला. या विजयामुळे कोलकाताने प्लेऑफच्या शर्यतीतील आपले आव्हानही कायम ठेवले.
दरम्यान, शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकेल, हे समजत नव्हते. मात्र,शेवटच्या चेंडूवर रणनीती कोलकातासाठी कामी आली आणि संघाने महत्त्वाचे २ पाँइंट्लही मिळवले.
या सामन्यात कोलकाताने २०७ धावांचे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था ५ बाद ७१ धावा अशी झाली होती. पण नंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार रियान परागने डाव सावरताना संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
रियानने सलग ६ षटकारही मारत संघाला विजयाचा मार्ग दाखवला होता. पण हेटमायर २९ धावांवर आणि रियान पराग ९५ धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात राजस्थानला २२ धावांची गरज होती. यावेळी जोफ्रा आर्चर आणि शुभम दुबे फलंदाजी करत होते.
शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूत तीन धावा आर्चरने केल्यानंतर शुभम दुबेने पुढच्या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार मारला होता. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. शुभम स्ट्राईकवर होता. गोलंदाजी करताना वैभव अरोरा दबावात होता.
कारण आधीच १९ धावा ५ चेंडूत निघाल्या होत्या. अशावेळी रहाणे त्याच्याजवळ गेला. त्याने वैभवला आधी धीर देत शांत केले आणि त्याला शुभमविरुद्ध शेवटचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा सल्ला दिला. तसेच रहाणेने या चेंडूसाठी क्षेत्ररक्षणातही बदल केले. त्याने रिंकू सिंगला लाँग ऑनवरून लाँग-ऑफला पाठवले.
रहाणेचा यॉर्करचा सल्ला आणि क्षेत्ररक्षणातील बदलच सामन्याचा टर्निंग पाँइंट ठरला. कारण आधीच फॉर्ममध्ये असलेल्या शुभम दुबेला वैभवकडून आलेल्या उत्तम यॉर्करवर मोठा फटका खेळता आला नाही. त्याने लाँग ऑफला शॉट खेळला.
त्यानंतर आर्चर आणि त्याने पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी पळत असताना लाँग-ऑफला असलेल्या रिंकू सिंगने चेंडू पकडला आणि तो नॉन-स्ट्रायरप एन्डला फेकला. तो चेंडू वैभवने पकडत आर्चरला धावबाद केले. त्यामुळे कोलताताने अवघ्या एका धावेने हा सामना जिंकला. रहाणेने शेवटच्या चेंडूवर वापरलेल्या रणनीतीचे सध्या कौतुक होत आहे.
सामन्याच्या शेवटी शुभम दुबे २५ धावांवर नाबाद राहिला, तर आर्चर १२ धावांवर नाबाद राहिला. कोलकाताच्या २० षटकात ८ बाद २०५ धावा झाल्या. तत्पुर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकात ४ बाद २०६ धावा केल्या होत्या.
कोलकाताकडून आंद्रे रसेलने २५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. तसेच अंगक्रिश रघुवंशीने ४४ धावांची आणि कर्णधार अजिंक्य रहाणनेने ३० धावांची खेळी केली. रेहमनुल्ला गुरबाजने ३५ धावांची खेळी केली.