सोलापूर : सोलापूर शहर व परिसरासाठी मे महिन्याची सुरुवातच कडाक्याच्या उन्हाने झाली. १ मे रोजी ४४.१ तर २ मे रोजी ४४.७ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याने मे महिन्यातील उन्हाच्या कडाक्याबद्दल चिंता वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून सोलापुरच्या तापमानात घट होऊ झाली आहे. सोलापूर शहर व परिसरासाठी हा आठवडा ढगाळ वातावरणाचा आणि अवकाळी पावसाचा राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसात सोलापुरच्या तापमानात ४.१ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. दोन दिवसात तापमानात मोठा बदल बघायला मिळाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सध्याचा उन्हाळा शेवटच्या टप्प्यातील असल्याचे मानले जात आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उष्माघात उपचाराचा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत कोणीही दाखल नसल्याची माहिती कक्षाचे प्रमुख डॉ. धडके यांनी दिली.
असे राहिले आठवड्याचे तापमान
तारीख तापमान
४ मे ४०.६
३ मे ४२.५
२ मे ४४.७
१ मे ४४.१
३० एप्रिल ४३.६
२९ एप्रिल ४२.९
२८ एप्रिल ४१.५
------------------------------------------------------------------------------
असे राहिल ‘या’ आठवड्याचे तापमान
दिवस तापमान
५ मे ४१
६ मे ४०
७ मे ३७
८ मे ३७
९ मे ३८
१० मे ३९
दाहकता कमी करण्यासाठी...
वाढत्या उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी पांढऱ्या, सुती कपड्यांचा वापर वाढला आहे. टोपी, गॉगल, रुमालचा वापर वाढला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका अधिक असल्याने सायंकाळपर्यंत बाहेर पडणे शक्यतो अनेकजण टाळत आहेत. बाजारात खरबुज, कलिंगड या फळांसह इतर उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. या फळांच्या माध्यमातून व मठ्ठा, ताक, लस्सी, आईस्क्रिम, कुल्फी या थंड पदार्थ/पेयांच्या माध्यमातून दाहकता कमी केली जात आहे.