'हाऊस अरेस्ट' या वादग्रस्त शोमुळे चर्चेत असलेला अभिनेता एजाज खानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एजाज खानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज खानवर ३० वर्षीय अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. तिने या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याची दखल घेत एजाज खानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एजाज खानवर अभिनेत्रीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. इंडस्ट्रीमध्ये काम देतो असे म्हणत त्याने अभिनेत्रीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगितले आहे की, 'ने मला त्याच्या हाऊस अरेस्ट या शोमध्ये होस्टची भूमिका देण्यासाठी फोन केला होता. शूटिंग सुरू असताना एजाज खानने मला प्रपोज केला आणि नंतर त्याने मला धर्म बदलून लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. पण यानंतर, एजाजने माझ्या इच्छेविरोधात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझ्यावर अनेक वेळा बलात्कार केला.'
एजाजच्या त्रासाला कंटाळून पीडित अभिनेत्रीने रविवारी संध्याकाळी चारकोप पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. एजाज खानविरोधात बलात्काराशी संबंधित भारतीय दंड संहिेतेच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध चारकोप ठाण्यात बीएनएसच्या कलम ६४, ६४(२एम), ६९, ७४ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अभिनेता एजाज खान आधीच वेब शो 'हाऊस अरेस्ट'मुळे वादात सापडला आहे. या शोमधील कंटेट खूपच घाणेरडा आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शोमध्ये एजाज खान महिला कंटेस्टेंटला कपडे काढण्यासाठी सांगतो आणि पुरूष कंटेस्टेंटसोबत आक्षेपार्ह पोज देण्यास सांगतो. हा शो बंद करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. अश्लिल कंटेटसंदर्भात एजाज खानसह अनेक जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.