महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर झालाय. बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध झालाय. निकाल जाहीर होण्याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही भावुक झाली. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं. तर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं बारावीची परीक्षा दिली होती.
बारावीच्या निकालाआधी भावुक झालेल्या वैभवीने म्हटलं की, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाहीयेत. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला लागेल. वैभवीनं निकालाआधी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतंल. यानंतर तिने निकाल पाहिला. वैभवी देशमुख हिला बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळाले आहेत.
आज पाच महिने झाले तरी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वांना वाटतं की तो लवकर मिळायला हवा. सरकारनेही लवकर न्याय द्यावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. गुन्हे वाढत राहिले तर देश पुढे जाण्याऐवजी मागे येतोय असंही वैभवी देशमुख म्हणाली.