Kalyan Rain: कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, रिक्षावर झाड कोसळलं; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
Saam TV May 07, 2025 07:45 AM
अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण पूर्वमध्ये दुर्दैवी घटना घडली. अचानक आलेल्या पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गुलमोहराचे भले मोठं झाड कोसळलं. हे झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोड परिसरातील रचना पार्कजवळ ही घटना घडली. रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहाचा अक्षरश:चा चेंदामेंदा झाला. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाड बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,, डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना घडली. कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे भलं मोठं झाड रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळले. या रिक्षातून रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी प्रवास करत होते.

अचानक रिक्षावर झाड कोसळल्याने हे तिघेजण रिक्षात अडकले या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागासह ,पोलीस यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत चालकासह दोन्ही वृद्ध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली. लता राउत, तुकाराम ठेगडे अशा मृत्यू झालेल्या प्रवाशांची नाव असून उमाशंकर वर्मा असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.