सिंदखेड राजा - तालुक्यातील सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात असलेली तीन जनावरे वीज पडल्याने मृत्युमुखी पडली. ५ मे रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान घटना घडली आहे.
शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाच्या जवळ बैलगाडी जवळ दोन बैल एक वासरू व दोन गाई बांधलेल्या असताना अचानक वीज पडून एक बैल,एक वासरू एक गाय या तीन जनावरांचा जाग्यावरच मृत्यू झाला, सुदैवाने शेतकरी त्या ठिकाणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
शेतकऱ्यांचे दोन जनावर हे गंभीर जखमी झाले आहेत. बाजीराव ताऊबा आंधळे ह्या शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. लिंबाच्या झाडाखाली बांधलेली जनावरे मृत्युमुखी अवस्थेत दिसली.यावेळी शेतकरी बाजीराव आंधळे त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचा पहायला मिळाला.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, तलाठी विष्णू थोरवे घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. तहसीलदार अजित दिवटे यांनी शेतातील जनावरे झाडाखाली न बांधण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाकडून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्ती भरपाई शासनाकडून तात्काळ मिळण्याची अपेक्षा शेतकरी बाजीराव आंधळे यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना व्यक्त केली आहे. शेतकऱ्यावर कोसळलेला संकटामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश मुंढे यांनी मृत जनावरांचे शिवविच्छेदन करण्यात आले. यावेळी देवानंद खाडे, भानुदास नागरे, ऋषिकेश आंधळे, समाधान बुधवत, योगेश आंधळे, ज्ञानेश्वर सोनुने, खंडू खाडे, अशोक नागरे,यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उपस्थित होते.
चिमणीचाही मृत्यू
शेतातील लिंबाच्या झाडावर दुपारची वेळ असल्यामुळे चिमणी बसलेली होती. परंतु अचानक विजेचा कडकडाट सुरू झाल्यामुळे झाडावर बसलेली चिमणीचा सुद्धा जनावरांसोबत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे जनावरांसोबत पक्षांना सुद्धा फटका बसला आहे.