नागपूर - फरशीने डोक्यावर वार करून ६० वर्षीय महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना झिरो माईल जवळ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महिलेची ओळख पटली नाही. तिचे कपडे फाटले असल्याने तिच्यावर अत्याचार करण्याची शंका व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरो माईल जवळ एक वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या डोक्यावर फरशीने वार केल्याचे आढळले.
याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह मेयो रुग्णालयात हलविला. महिलेचे वस्त्र फाटले असल्याने पोलिसांनी अत्याचार झाल्याची शंका व्यक्त केली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री झिरो माईल स्तंभ चौकात ही महिला फिरत होती. पावसाने भिजल्यामुळे स्तंभाजळील एका झाडाचा आधार तिने घेतला. सोमवारी रात्री दोन पोलिसांना ती रस्त्याच्या कडेला बसल्याचे दिसले. पोलिसांनी तिला प्यायला पाणी दिले आणि निघून गेले.
मध्यरात्रीनंतर ती महिला झाडाखाली झोपली असता दारू किंवा अंमली पदार्थाच्या नशेत आलेल्या आरोपीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असावा. तिने प्रतिकार केला असता तिच्या डोक्यावर आदळली. नंतर आरोपीने पळ काढला असावा, अशी शक्यता प्राथमिक तपासात वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी एका नागरिकाला रक्ताने माखलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही वेळानंतर सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला.
महिलेची ओळख अद्याप स्पष्ट नाही
मृतक महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिच्याजवळ कोणतेही ओळखपत्र पोलिसांना आढळले नाही. ही महिला भिकारी असून ती मतिमंद असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. तर ताब्यात घेण्यात आलेली संशयित सुद्धा मानसिक रोगी असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अजूनही स्पष्टता नसून पोलिसांकडून याचा दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आरोपी नेमका कोण याचे गूढ कायम आहे.
घटनास्थळी सीसीटीव्ही नाही
झिरो माईल चौकात सीसीटीव्ही नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे घटना नेमकी कशी घडली याचा सुगावा पोलिसांना सीसीटीव्ही माध्यमातून मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संविधान चौक आणि मॉरेस कॉलेज टीपॉइंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी पोलिस करीत आहे. महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही नसल्याचे प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.