Operation Sindoor Weapon : भारताने पुन्हा एकदा आपल्या लष्करी क्षमतेचं अचूक आणि नियंत्रित प्रदर्शन करत दहशतवादाविरोधात मोठा पाऊल उचललं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजित हल्ले केले. एकूण नऊ ठिकाणी हे हल्ले करण्यात आले असून, यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांच्या गडांचा समावेश आहे.
हे हल्ले कोणत्या ठिकाणी झाले?
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, बहावलपूर, सियालकोट, कोटली, मुध्रिके, कलान आणि मुजफ्फराबाद या भागांमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत पाकिस्तानच्या लष्करी स्थळांना स्पर्शही केला गेला नाही, हे स्पष्ट करत भारतीय लष्कराने सांगितले की, ही कारवाई पूर्णतः नियंत्रित, लक्ष केंद्रीत होती.
"Precision Strike Weapon System" (PSWS) ही एक अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. यामध्ये जीपीएस, लेझर, रडार आणि इन्फ्रारेड मार्गदर्शन प्रणालींचा वापर करून लक्ष्यावर काही मीटरच्या आत अचूक हल्ला करता येतो. हे हत्यार प्रामुख्याने ड्रोन, उपग्रह आणि रडारमधून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्य निश्चित करतं.
भारतीय नौदलाचे माजी कमोडोर श्रीकांत केसनूर यांच्या मते, PGM ही एक "स्मार्ट बॉम्ब" प्रकारातील अस्त्रे आहेत, जी स्थिर किंवा हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर अचूक प्रहार करतात. "जर हल्ला ५०–६० मीटरने चुकला, तर चुकीच्या इमारतीवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अचूकतेचं फार महत्त्व असतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारताने हे हल्ले करून जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. "आम्ही फक्त ज्यांना लक्ष्य केलं, त्यांच्यावरच हल्ला केला." यात कोणतीही अतिरेकी कारवाई नाही, तर एक स्वसंरक्षण व दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
या ऑपरेशनमुळे भारताच्या धोरणात्मक संयमाची आणि अचूक कारवाई क्षमतेची प्रचीती पुन्हा एकदा जगाला झाली आहे. शेजारी देशांकडून सातत्याने होणाऱ्या घुसखोरी व दहशतवादाला उत्तर देताना भारताने आंतरराष्ट्रीय सीमांचा आदर राखत, फक्त दहशतवादी केंद्रांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे.