महाशक्ती देशाचं ‘ते’ भाकीत ठरलं खरं, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेमकं तेच घडलं!
GH News May 07, 2025 09:35 PM

Operation Sindoor : भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलंय. भारताच्या या हल्ल्यात जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, भारताच्या या सिंदूर मोहिमेबाबत जागतिक पातळीवरील एका नेत्याने भाकित वर्तवलं होतं. विशेष म्हणजे हेच भाकित आता खरं ठरलं आहे.

9 ठिकाणी झाले हल्ले

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके आणि पाकिस्तानात असलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. भारताने या मोहिमेअंतर्गत एकूण 9 ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. याच हल्ल्यांबाबत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी भाकित केले होते. त्यांचे हे भाकित आता खरे ठरले आहे. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर व्हेन्स यांनी भारत या हल्ल्याचा बदला घेईल आणि दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करेल असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज आता खरा ठरला आहे.

जेडी व्हेन्स नेमकं काय म्हणाले होते?

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली होती. हा हल्ला झाल्यानंतर त्यांनी फॉक्स न्यूजला प्रतिक्रिया दिली होती. यावेली बोलताना त्यांनी भारत आता या हल्ल्याला सडेतोड उत्तर देणार आहे, असे म्हटले होते. तसेच भारताची ही कारवाई सीमित असेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. यासह त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष आणखी वाढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पाकिस्तानने भारताला साथ देत दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. जेडी व्हेन्स यांचे हेच भाकीत आता खरे ठरले आहे.

22 एप्रिल रोजी पहलगावर हल्ला

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता भारताने पीओके आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. ज्या दिवशी पहलगावर हल्ला झाला, त्याच दिवशी जेडी व्हेन्स हे भारताच्या दौऱ्यावर होते. या दिवशी भारत आणि अमेरिका यांच्यात राजनयिक चर्चा होत असताना हा हल्ला झाला होता.

लष्कर ए तैयबाचे मुख्यालय ध्वस्त

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यात जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. यासह लष्कर ए तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या कॅम्पनाही लक्ष्य करण्यात आलं. भारताने सर्वांत मोठा हल्ला हा बहावलपूर येथे केला. हे ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी जैश ए मोहोम्मदचे मुख्यालय आहे. हे मुख्यालय हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्याचे म्हटले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.