‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात पुन्हा चमकलं सोनं; किमतींत मोठी वाढ, दर गेले थेट एक लाख पार
Marathi May 08, 2025 10:25 AM

सोन्याच्या किंमतीने एक लाख रुपये ओलांडले: भारतीय सैन्यानं (Indian Army) जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पहलगाममध्ये तब्बल 26 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. याचाच बदला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवून घेतला. भारतीय सैन्यदलानं संयुक्तपणे कारवाई करत पाकिस्तानातील तब्बल 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरनं या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाल्याची कबुलीही दिला. या कारवाईनंतर, पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला, तर भारतीय बाजार सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला आणि मजबूत राहिला.

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या (India Pakistan Tensions) पार्श्वभूमीवर सोन्याचे दर (Gold Price) पुन्हा 1 लाखांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी 23 एप्रिल रोजी म्हणजेच, पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या पुढे गेला. महत्त्वाची बाब म्हणजे, जागतिक अनिश्चिततेमुळे, सोनं ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे आणि लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

पुन्हा एकदा सोनं एक लाख पार…

बुधवारी भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत, तब्बल 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर सोन्याच्या किमतींनी थेट आभाळ गाठलं. भारताच्या राजधानीचं ठिकाण दिल्लीबाबत बोलायचं झालं तर, बुधवारी सोनं 1 हजार रुपयांनी महागलं आणि प्रति 10 ग्रॅम सोनं 1 लाख रुपयांच्या पुढे गेलं. इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, मंगळवारी मंगळवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99,750 रुपये होता, जो एका दिवसानंतर म्हणजेच, बुधवारी 1000 रुपयांनी वाढून 1,00,770 रुपये झाला.

बुधवारी 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किमतीत 1.50 रुपयांची वाढ झाली आणि ते 1,00,350 रुपये प्रति दहा ग्रॅम दरानं विकलं गेलं. यापूर्वी 22 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत 1800 रुपयांची मोठी वाढ झाली होती आणि ऐतिहासिक विक्रम गाठत सोनं 1,01,600 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत होतं.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोनं स्वस्त

गेल्या महिन्यात अक्षय्य तृतीया होती, ज्या दिवशी भारतात सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची मागणी कायम राहिली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, बुधवारी आणि त्यापूर्वी सलग तीन दिवस सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याची किंमत सुमारे 5 हजार रुपयांनी वाढली आहे. दरम्यान, जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलालो तर, सोनं स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत मंदावलेली राहील, याचं कारण अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधांतील तणाव कमी झाले आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Gold Rate : भारत पाकिस्तानमधील तणाव वाढताच, सोन्याच्या दरात मोठी वाढ, पुन्हा एकदा 1 लाखांचा टप्पा ओलांडला

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.