ढिंग टांग : निजामे शम्सी की करतूत...!
esakal May 08, 2025 10:45 AM

ढिंग टांग''

सुबेदार-ए-लष्कर कोहिनूर-ए-आईएसआई असीम मलिकसाहब, यह खुतूत निहायतही खुफिया जगह से लिख रहा हूं. काल रात्रीपासून फार दुखते आहे! बदनमध्ये अशी जगह नाही की जिथे दर्द नाही. कल की रात…मानो, इस रात की कोई सुबहाही नहीं हो! हिंदोस्तानी फौजने बिना वजहा हमारे मासूम दहशतगर्दों पर हमला बोलकर बहोत सारा मुल्क तसनस कर दिया.

ये सब कैसे हुआ? दुश्मनने इस करतूत को कैसे अंजाम दिया, इसकी मालुमात करके हमें इत्तला करो. शहाबाज शरीफ, वझीरे आजम ए पाकिस्तान.

वझीरे आजम ए पाकिस्तान जनाब शहाबाजमियां, मी सलामत आहे, आणि तुमच्यासारखाच खुफिया जगहमध्ये लपून बसलो आहे. कोड लँग्वेजमध्ये याने की मराठी जुबानमध्ये हे खत लिखत आहे. काल रात्री नऊ ठिकाणी पडोसी मुल्कातील काही बेरहम विमानांनी आणि मिसाइलांनी आपल्या मुल्कात येऊन हमला केला. पण यात आपली काहीच गलती नाही. माझ्या खुफिया जानकारी नुसार निजामे शम्सी (पक्षी : ग्रहमालिका) मधील सायरांनी (पक्षी : ग्रहांनी) केलेले हे उद्योग आहेत! मला एका होराभूषण पंडिताने सध्या पाकिस्तानच्या कुंडलीत चिक्कार घोळ झाला असून मियां जुहल (पक्षी : शनी महाराज) यांचे हे प्रताप आहेत. सायरे फिरले की सगळे उलटसुलट होते. हिंदुस्तानी अवाम जुहल ग्रहाला शनी का म्हणतात, हे कळले नाही. साडेसाती नावाचा एक प्रकार असतो. कंबख्त जुहल याने की शनीची साडेसाती लागली की अडीच वर्षात बेकार हाल होतात, असे म्हणतात. बुऱ्या कामांचे बुरे फळ शनी महाराज देतात, असे कळते. सगळे काही आलबेल चालले होते, पण गेल्या २९ एप्रिलला शनी महाराजांनी मीन राशीत प्रवेश केला. काही जरुरत नव्हती, पण केला!! इंडियन लोगांचे हेच मला पसंद नाही. ‘घुस के मारेंगे’ हा धडा ते बहुतेक या शनी महाराजांकडूनच शिकले!! मीन राशीत बिना वजहा घुसने की जरुरतही क्या थी?

मीनेतील शनी आता मरीख (पक्षी : मंगळ), हर्षल आणि चंद्र (पक्षी : चांद) यांच्याही केंद्रात असल्याने पाकिस्तान येत्या दिसंबरपर्यंत पुरी तरीकेसे तबाह होणार, असे भाकित काही इंडियन होराभूषणांनी वर्तवले आहे. पाकिस्तानचा मरीख कडक असून नीचेचा आहे. सबब तबाही अटळ आहे, असे खुफिया अहवालात म्हटले आहे.

मसला इथेच संपत नाही. कुंडली-ए-पाकिस्तानमध्ये चतुर्थात जुहल, आणि प्लुटो आहे. शिवाय मार्केश जोहरा (पक्षी : शुक्र) दुश्मनासारखा बर्ताव करु लागला आहे. मग काय होणार? डिसेंबरपर्यत पाकिस्तानचा सुपडा साफ होईल, असे भाकित आहे. निझामे शम्सीमधील सगळेच ग्रहगोल असे दुश्मनासारखे वागू लागल्यावर आपला तरी काय दोष?

मेरा मशवरा मानो, हम दोनो कबिले के साथ लंडन या तो किसी और मुल्कमध्ये जाऊन पनाह लेंगे!! कोण या बमबारीत इथे राहील? मासूम दहशतगर्दांनाही मी पैगाम पाठवला आहे की निझामे शम्सीपुढे कुणाचे काही चालत नाही. आईएसआईचेसुध्दा नाही, सबब सध्या शेपूट पायात दाबून बसणे केव्हाही चांगले!!

जाता जाता अर्ज किया है-

ऐ, निझामे-शम्सी, हमनें तुम्हारा क्या है बिगाडा

जुहल-जोहरा, मरीख-औ-चांद तुमने क्यों है लताडा

न बची इज्जत, ना रुतबा, ना रहे चश्मेबद्दूर

घुस के मारा हमे और कहते है आप्रेशन सिंदूर?

..जनाब, जान सलामत तो कुर्सी पचास!! निकल लो!! आपका अपना, असीम मलिक.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.