Operation Sindoor : भारतीय लष्कराचा अभिमान : काँग्रेस
esakal May 08, 2025 10:45 AM

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला. भारतीय लष्कराचा अभिमान असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या घोषणेनंतर सोशल मीडिया एक्सवर प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाईसाठी कॉंग्रेसने सरकारला पाठिंबा दिला असल्याचेही स्पष्ट केले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून उगम पावणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात ठाम असे भारताचे राष्ट्रीय धोरण आहे. भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवायांचा अत्यंत अभिमान आहे.

त्यांच्या धैर्याला आणि निर्धाराला सलाम करतो. पहलगाम हल्ल्याच्या दिवसापासून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सशस्त्र दलांबरोबर आणि सरकारबरोबर ठामपणे उभं राहत सीमापार दहशतवादाविरोधात कोणतीही ठोस कृती करण्याला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आणि राष्ट्रीय हित सर्वात महत्त्वाचे असून काँग्रेस पक्ष लष्कराच्या ठामपणे उभी असल्याचा निर्वाळा दिला.

राहुल गांधींनी "आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!” अशा शब्दांत आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. तर प्रियांका गांधी वद्रा यांनीही लष्कराबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, की आपले शूर जवान स्वातंत्र्य आणि अखंडता सुरक्षित ठेवतात. देव त्यांचे रक्षण करो आणि त्यांना धैर्याने व शौर्याने आव्हानांचा सामना करण्यासाठी अपार शक्ती देवो. जय हिंद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.