नागपूर - यांत्रिकीकरणाच्या या युगात आजही अनेक समाजांत ओझे वाहण्याकरिता गाढवांचा उपयोग होतो. त्याची दखल घेत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) गाढवांच्या कैकाडी, गोदावरी जातींना स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
देशात अवर्णित जनावरांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवांशिक संशोधन ब्यूरोद्वारा पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील अशा अवर्णित जनावरांच्या सर्व्हेक्षणाचे काम ‘माफसू’वर सोपविण्यात आले आहे.
त्यानुसार, माफसूने पश्चिम विदर्भात आढळणाऱ्या तसेच कैकाडी व गोदावरी गाढवाविषयी माहिती संकलनाचे काम हाती घेतले आहे.
माफसूचे डॉ. प्रवीण बनकर यांनी सांगितले, की कैकाडी गाढव हे अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात आढळते. याचा रंग राखाडी असून उंच असते. अधिक तापमानातसुद्धा हे गाढव ५० ते ६० किलो वजन सहज वाहून नेते. कैकाडी समाज अनेक वर्षांपासून त्यांचे संगोपन करीत असून ‘कैकाडी गाढव’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
गोदावरी गाढवाची वैशिष्ट्ये
बहुतांश काळे तोंड
कपाळावर बहिर्वक्र
तोंडावर पांढरे चिन्ह
जबड्याच्या मागे पांढरे चिन्ह
कानाच्या पंखाच्या टोकाभोवती गडद तपकिरी अस्तर
कानाच्या पंखाच्या आतील बाजूस लांब पांढरे केस
कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांच्या पुढाकारातून राज्यातील अवर्णित जनावरांना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. या अंतर्गत गोदावरी गाढव विषयक डॉ. जी. आर. चन्ना, डॉ. पी. व्ही. जाधव, तर कैकाडी गाढवाच्या सर्व्हेक्षणाचे काम डॉ. प्रवीण बनकर यांच्याद्वारे होत आहे.
- डॉ. अनिल भिकाने, विस्तार शिक्षण संचालक, माफसू, नागपूर