India Attack On Pakistan : भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करून पाकला सळो की पळो करून सोडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. भारताच्या या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला असून पाकिस्तानने थेट भारतावरच हल्ला केला आहे. पाकिस्तानने काल रात्री भारतातील 15 सैन्य ठिकाणांना टारगेट केलं होतं. 15 शहरांमध्ये हा हल्ला केला होता. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला आहे. भारताने रशियाच्या एस-400 च्या मदतीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल हवेतच नेस्तानाबूत केल्या आहेत.
सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलने भारतातील 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ़, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सहीत उत्तर आणि पश्चिमी भारतातील अनेक सैन्य तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. भारताने या हल्ल्याला इंटीग्रेटिड काऊंटर यूएएस आणि एअर डिफेन्स सिस्टिमच्या मदतीने निष्क्रिय केलं. या हल्ल्याचे ढिगारे अनेक ठिकाणाहून जमा केले जात आहेत. त्यावरून पाकिस्तानने काल रात्री भारतावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे.
भारतीय सैन्याने सतर्कता दाखवून एस-400 म्हणजे सुदर्शन चक्र एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल उद्ध्वस्त करण्यात आल्या. सकाळी सकाळीच पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोनचा ढिगारा सीमावर्ती परिसरात पाहायाला मिळाले. भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण एस-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमच्या सहाय्याने हा हल्ला परतवून लावण्यात आला आहे, असं सैन्याने म्हटलं आहे.
पाकिस्तानने सीमेपलिकडून गोळीबार सुरूच ठेवला आहे. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि कॅलिबर आर्टिलरीचा उपयोग करून पाकिस्तानने विनाकारण गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे 16 निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला आणि पाच मुलींचा समावेश आहे. पाकिस्तानने सीमेपलिकडून भ्याड हल्ला सुरूच ठेवल्याने भारतालाही त्याला जशास तसे उत्तर द्यावं लागलं आहे.