आयपीएल 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. आता प्रत्येक सामन्यानंतर टॉप 4 गणित सुटणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या सामन्यावर युद्धजन्य स्थितीचं सावट पसरलं आहे. दोन्ही देशातील तणावपूर्ण स्थिती पाहाता धर्मशाळा येथे होणार सामना इतरत्र हलवण्याशिवाय पर्याय नव्हता. हे मैदान सीमेजवळ असल्याने सामन्याबाबत धाकधूक होती. 11 मे रोजी हा सामना धर्मशाळेत होणार होता. मात्र आता हे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना धर्मशाळेऐवजी अहमदाबाद येथे होणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल पटेल यांनी धर्मशाळेतून सामन्याचं ठिकाण बदलल्याचं सांगितलं. 11 मे रोजी होणारा पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यापूर्वी हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल असं सांगण्यात येत होतं.
भारताने दहशतवादाविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर हालचाली सुरु केल्या आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून हल्ला होऊ शकतो ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने बॉर्डरजवळील राज्यांना अलर्ट दिला आहे. इतकंच काय शहरातील एअरपोर्ट पुढच्या काही तासांसाठी बंद केलं आहे. या एअरपोर्टवरून सर्व सिविल उड्डाणं रद्द केली आहेत. धर्मशाळा आंतरराष्ट्रीय बॉर्डरपासून 150 किमी दूर आहे. त्यामुळे या ठिकाणचे एअरपोर्टही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मुंबई आणि पंजाब सामना शिफ्ट केला आहे.
8 मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना धर्मशाळा मैदानावर होणार आहे. हा सामना ठरलेल्या रणनितीनुसारच होणार आहे. यापूर्वी या सामन्याचं ठिकाण बदललं जाईल असं सांगण्यात येत होतं. पण हा सामना धर्मशाळेतच होणार आहे. हा सामना पंजाब किंग्सने जिंकला तर गुणतालिकेत 17 गुणांसह टॉपला जाईल.