Satara: साताऱ्यात जुनी इमारत कोसळली; काही समजायच्या आतच भिंतच पडली, त्यानंतर नेमकं काय घडलं..
esakal May 08, 2025 02:45 PM

सातारा : येथील यादोगोपाळ पेठेत नवीन इमारतीच्या कामासाठी सुरू असणाऱ्या खुदाईदरम्यान लगतच्या जुन्या लक्ष्मी निवास या इमारतीचा संपूर्ण भाग कोसळला. भाग कोसळण्यापूर्वी अगदी काही मिनिटे त्याठिकाणी काम करणारे सुमारे १० ते १२ कामगार बाहेर आल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पालिकेच्या अभियंत्यांनी, तसेच शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.


घटनास्थळावरून याबाबतची मिळालेली माहिती अशी, यादोगोपाळ पेठेत एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या कामासाठी त्याठिकाणी खुदाई करण्यात येत आहे. खुदाई सुरू असणाऱ्या जागेलगत माळवदी कडीपाट असणारी पोटमाळ्याची इमारत आहे. बुधवारी याठिकाणी नेहमीप्रमाणे खुदाईचे काम सुरू होते. यासाठी त्याठिकाणी दहा कामगार कार्यरत होते. खुदाई झाल्यानंतर त्याठिकाणी पडलेला राडारोडा त्याठिकाणच्या कामगारांनी ट्रॅक्टर ट्रॉलीत भरला. यानंतर ट्रॉली व कामगार त्याठिकाणाहून बाहेर पडले. यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास जुन्या इमारतीच्या पायालगतची भिंत खचण्यास सुरुवात झाली. थोडी थोडी खचत नंतरच्या काळात भिंतीचा काही भाग कोसळला. यानंतर काही वेळातच संपूर्ण भिंत कोसळली. सुदैवाने भिंत पडण्यापूर्वीच त्याठिकाणी असणारे कामगार बाहेर पडले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


भिंत पडण्याच्या आवाजामुळे, तसेच उडालेल्या धुरळ्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. नागरिकांनी त्याठिकाणाकडे धाव घेत पडलेल्या भिंतीच्या राडारोड्याखाली कोणी दबले आहे का, याची चौकशी केली. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकाने त्याठिकाणी जात पाहणी केली. याचदरम्यान शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकानेही त्याठिकाणी येऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी झालेल्या पडझडीचा पंचनामा करण्याचे काम पालिकेच्या मार्फतीने सुरू होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.