पाकिस्तानातील मुरिदके येथे लष्कर-ए-तैयबाच्या ‘मरकज तैयबा’ उद्ध्वस्त झाले आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये अजमल कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झाला आहे. सैन्य दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली आहे. मरकज तैयबा हे त्या 9 दहशतवादी तळांपैकी एक आहे. जिथे मंगळवार-बुधवारी भारतीय सशस्त्र दलाने कारवाई केली आहे.
भारतीय सैन्यदलाची कारवाई
पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाक व्याप्त भागातील 9 दहशतवादी कॅम्पवर ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांचा गड असलेला बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचा गड आणि मुरीदके येथील लश्कर-ए-तैयबाच्या ठिकाणांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना ठार केले. यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला. त्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले.
महिला लष्कर अधिकाऱ्यांनी दिली कारवाईची माहिती
भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी संयु्क्त पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार, दहशतवाद्यांच्या तळ अचूक भेदण्यात आली. रहिवाशी ठिकाणं आणि लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा पाकिस्तान, तिथले लष्कर आणि दहशतवाद्यांना मोठा झटका मानण्यात येत आहे.
या ठिकाणांवर अटॅक
बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयब्बाचे ठिकाण, चक अमरू, सियालकोट, भीमबेर, गुलपूर, कोटली, बाघ आणि मुझफ्फराबाद येथे लष्कराने ड्रोनद्वारे मिसाईल डागली. एकूण 9 ठिकाणांवर भारताने हल्ला केला. कारवाई दरम्यान केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही.
कसाब या येथे मिळाले ट्रेनिंग
कर्नल कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकज तैयबा, आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळपास 18-25 किलोमीटर दूर आहे. 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली याला सुद्धा येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते.
मुरीदके येथील मरकज तैयबा हे हाफिज सईद याच्या नेतृत्वाखाली लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते. मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. त्याला याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्याने दिली होती, असे ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. त्याला नोव्हेंबर 2012 रोजी पुणे येथील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.