Rohit Sharma Captain : रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून आकडेवारी, हिटमॅन किती यशस्वी?
GH News May 08, 2025 04:07 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी 7 मेला टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. रोहिते सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.रोहितसाठी कसोटी क्रिकेटमध्ये गेली काही महिने संघर्षपूर्ण राहिली. रोहितने त्यानंतर आपल्या कसोटी कर्णधारदासह खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली. रोहितने गेल्या काही महिन्यांचा अपवाद वगळता कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच रोहितची कर्णधार म्हणूनही समाधानकारक कामगिरी राहिली. रोहितच्या निवृत्ती निमित्ताने त्याची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी कशी होती? हे जाणून घेऊयात.

रोहितने 2013 साली इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केल. रोहितने कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं. रोहित मधल्या फळीत खेळायचा. मात्र रोहितच्या कामगिरीचा चढता आलेख पाहता त्याला ओपनिंग करण्याची संधी मिळाली. रोहित 2019 पासून सलामी करण्याची संधी देण्यात आली. रोहितने त्यानंतर 2021 साली शानदार कामगिरी केली. रोहितने 2021 मध्ये 47.68 च्या स्ट्राईक रेटने 906 धावा केल्या. मात्र 2024 हे वर्ष रोहितसाठी फार निराशाजनक राहिलं. रोहितला 2024 मध्ये 24.76 अशा सरासरीने धावा केल्या. रोहितने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध (BGT 2024-2025) खेळला. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. रोहितने मालिकेतील सलामीच्या सामन्यात वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. रोहित पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातून फॉर्म नसल्याने स्वत:हून बाहेर झाला होता.

विराटचा राजीनामा आणि रोहित कर्णधार

विराट कोहली याने 15 जानेवारी 2022 रोजी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्मा याने आपल्या खांद्यार कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. रोहितने कसोटी कर्णधार म्हणून भारताला पहिल्याच मालिकेत श्रीलंकेविरुद्ध 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकून दिली. तसेच रोहितने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-2023 या साखळीतील अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने टीम इंडियाचं टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याची संधी हुकली.

त्यानंतर रोहितसेनेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत जोरदार सुरुवात केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यांच्या विरुद्ध 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर मायदेशात इंग्लंडचा 4-1 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने रोहितसेनेचा पाळापाचोळा केला. न्यूझीलंडने भारताला 3-0 अशा फरकाने व्हाईटवॉश दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका राखण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात या मालिकेत विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर रोहितच्या नेतृत्वात भारताला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे रोहितने पाचव्या आणि अंतिम सामन्यातून माघार घेतली होती. टीम इंडियाचा या मालिकेत 1-3 अशा फरकाने पराभव झाला.

रोहितची मालिकानुसार कामगिरी

  • श्रीलंका विरुद्ध 2-0 ने विजय (होम सीरिज)
  • बांगलादेश विरुद्ध 2-0 ने विजय (बांगलादेश दौरा)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-1 (होम सीरिज)
  • Wtc Final मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत
  • विंडीज विरुद्ध 1-0 ने विजय (विंडीज दौरा)
  • दक्षिण आफ्रिके विरुद्ध 1-1 ने मालिका बरोबरीत (दक्षिण आफ्रिका दौरा)
  • इंग्लंड विरुद्ध 4-1 ने विजय (होम सीरिज)
  • बांगलादेश विरुद्ध 2-0 ने विजय (होम सीरिज)
  • न्यूझीलंड विरुद्ध 0-3 ने पराभूत (होम सीरिज)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1-3 ने पराभूत (ऑस्ट्रेलिया दौरा)

कर्णधार रोहित शर्माची आकडेवारी

रोहित शर्माने टीम इंडियाचं 24 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 12 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. तर टीम इंडियाला 9 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 3 सामने ड्रॉ राहिले. रोहितने या 24 सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1 हजार 254 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.