भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर मध्यरात्री जोरदार हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हे हल्ले करून अतिरेक्यांचे अड्डेच जमीनदोस्त करण्यात आले आहेत. भारताने अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील पाच ठिकाणी आणि पाकिस्तानात थेट घुसून चार ठिकाणी हल्ले केले आहेत. भारताने अतिरेक्यांचे एकूण 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारताने ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले त्यात मुरीदके येथील हाफिज सईद आणि बहावलपूर येथील मौलाना मसूद अजहरच्या ठिकाण्यांचाही समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरच्या मरकज सुभान अल्लाहला मिसाईल अटॅकने जमीनदोस्त करण्यात आलं आहे. खतरनाक दहशतवादी मसूद अजहरच्या सर्वात मोठ्या ठिकाण्यापैकी हा महत्त्वाचा ठिकाणा मानला जातो. मरकज तैयबावरही भारताने हल्ला केला आहे. मुरीदकेमध्ये मरकज तैयबा आहे. दहशतवाद्यांचा आका हाफिज सईदचा हा टेरर प्वॉइंट आहे. तोच भारताने नष्ट करून टाकला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात असंख्य अतिरेकी मारले गेले आहेत. या अतिरेक्यांचा दफनविधीही झाला आहे. पण यातील एक ताबूत अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या ताबूतचं थेट कनेक्शन हाफिज सईद किंवा मसूद अजहरशी असल्याचीही चर्चा आहे.
बडे अधिकारी आले
ज्या पद्धतीने पाकिस्तानात या एका ताबूतला विशेष ट्रिट केलं जात आहे, त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. भारताच्या हल्ल्यात हाफिज सईद किंवा मसूद अजहर या दोघांपैकी एकजण ठार झाला असून त्यांच्यापैकी एकाचंच हे ताबूत असल्याची चर्चा आहे. या ताबूतमधील दहशवाद्याच्या दफनविधीला पाकिस्तानातील असंख्य नागरिक आले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या लष्कराचे बडे अधिकारीही आले होते. त्यामुळे दफनविधीला पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी यायला असा कोणता मोठा अतिरेकी मेला आहे? तो हाफिज किंवा मसूद तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. इतर अतिरेक्यांच्या दफनविधीला गर्दी नव्हती आणि पाकिस्तानी लष्करातील कोणताही अधिकारी नव्हता, त्यामुळे या चर्चांना आता बळ मिळू लागलं आहे.
ताबूत समोर नमाज पठण
हे ताबूत पाहून कोणी तरी मोठा अतिरेकी मेल्याचं दिसत आहे. पाकिस्तानकडून या जनाजावर फुलं चढवली जात आहे. त्यातील एका गुच्छावर COAS (म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ) लिहिलं आहे. तर दुसऱ्या गुच्छावर राष्ट्रपती लिहिलेलं आहे. तर एका दुसऱ्या ताबूतच्या समोर बसून लष्कर कमांडर हाफिज अब्दुल रउफ यांनी नमाज पठण केलं. या तीन पुराव्यामुळे आता हा ताबूत कुणाचा? भारताच्या हल्ल्यात नक्की कोण मारलं गेलं? हाफिज सईद की अजहर मसूद मारला गेला? असा सवाल आता केला जात आहे.
इतका मोठा दहशतवादी?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवाद्याच्या ताबूतवर फुलं चढवली जात आहे. त्यावर COAS (म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ) लिहिलंय. म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीर यांनी हे फूल मेलेल्या दहशतवाद्यासाठी पाठवलं आहे. पाकच्या सैन्यप्रमुखाने आणि राष्ट्रपतीने फूल पाठवावेत इतका मोठा दहशतवादी मेला का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनीही दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर फुलं पाठवली आहेत. त्यामुळेच हा दहशतवादी नेमका कोण आहे? अशी चर्चा आता रंगली आहे. या ताबूत समोर लष्करचा कमांडर हाफिज अब्दुल रऊफ यांनी नमाज पठण केलं. तर इतर पाकिस्तानी सैनिकांनी दु:ख व्यक्त केलं. जणू काही त्यांचा बडा अधिकारी किंवा पालनकर्ताच गेला की काय अशा अविर्भावात हे सैनिक दिसत आहेत. त्यामुळेच भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील बडा अतिरेकी मेल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे.