पुणे : तपास संस्थांचे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू असतानाच आता पोलिस असल्याचे भासवून शहरात दोघांची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी व अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी येथील फसवणूक प्रकरणी २६ वर्षीय तरुणाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित तरुणाला १७ व १८ ऑक्टोबर २०२४ रोजी वेगवेगळ्या मोबाईलवरुन अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. संबंधित व्यक्तींनी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, लवकरच तुम्हाला अटक करण्यात येणार आहे, अशी भिती दाखविली. त्यानंतर अटक टाळायची असल्यास केवळ चौकशी केली जाईल, असे सांगून फिर्यादीकडून ४ लाख ६५ हजार रुपये घेतले.
पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिस नसल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करत आहेत.
दरम्यान, पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याची दुसरी घटना कर्वेनगर परिसरात घडली. याप्रकरणी ७६ वर्षीय महिलेने अलंकार पोलिस फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत घडला आहे. फिर्यादी महिला या कर्वे पुतळ्याजवळ राहतात. त्यांना संजय पिसे नावाच्या व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधला. आपण पोलिस असल्याची बतावणी करून त्याने महिलेस तुमच्या आधारकार्डचा गैरप्रकारासाठी वापर केला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेची २१ लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली.