साडेपाच वर्षांनंतरही अंतिम निर्णय नाही! माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडील जातीचा दाखला खरा की खोटा? समितीकडून महास्वामींना 'हे' निर्देश
esakal May 09, 2025 05:45 AM

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अर्ज भरला होता. निकालानंतर काही दिवसांतच त्यांच्या अनुसूचित जातीतील बेडा जंगमच्या जात दाखल्यावर विनायक कंदकोरे, प्रमोद गायकवाड, मऱ्याप्पा मुळे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली. त्यावेळी संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. तक्रार करून आता साडेपाच वर्षे झाली, तरीदेखील डॉ. महास्वामींकडील जातीचा दाखला खरा की खोटा, या प्रश्नाचे अंतिम उत्तर मिळाले नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. शरद बनसोडे हे सोलापूरचे खासदार झाले. पण, भाजपने २०१९ च्या निवडणुकीत उमेदवार बदलला आणि डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात मैदानात उतरवले. या निवडणुकीत डॉ. महास्वामी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. पण, त्यांनी जातीचा खोटा दाखला जोडून निवडणूक लढविल्याची तक्रार झाली. जिल्हा जात पडताळणी समितीच्या तत्कालीन अध्यक्षांनी दक्षता पथकाचा अहवाल आणि संपूर्ण कागदपत्रांच्या पडताळणीअंती तो दाखला बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता डॉ. महास्वामींची खासदारकी जाणार, अशाही चर्चा झाल्या. मात्र, आता त्यांची टर्म संपून वर्ष झाले तरीदेखील डॉ. महास्वामींकडील जातीच्या दाखल्यावर अंतिम निकाल झालेला नाही.

बुधवारी (ता. ७) दाखल्यावर सुनावणी पार पडली असून, समितीने त्यांना दक्षता पथकाच्या अहवालावर म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणणे सादर झाल्यानंतर १९ मेनंतर पुढील सुनावणी होणार आहे. पडताळणी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाल्याने आगामी दोन महिन्यांत हे प्रकरण संपेल, अशी सर्वांनाच आशा आहे.

फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला, पण...

माजी खासदार डॉ. महास्वामींकडील जातीचे प्रमाणपत्र खरे की खोटे, यासंदर्भातील निकाल देण्यापूर्वी त्यांना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार जिल्हा जात पडताळणी समितीने एक संधी दिली. त्यानुसार गौडगाव बु. (ता. अक्कलकोट) ग्रामपंचायतीकडे महास्वामी यांच्या वडिलांच्या असलेल्या १९१५ मधील जन्म-मृत्यूच्या नोंदवहीतील शाई व अक्षरांची पडताळणी परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडून करण्यात आली. त्याचा अहवाल समितीला मिळाला, पण त्या अहवालात शाई कोणत्या काळातील आहे, याबद्दल काहीच नमूद नाही. त्यामुळे जात दाखल्याच्या निकालासाठी तो अहवाल फार महत्त्वाचा नसेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.