करुणा : प्रेरणादायी शक्ती!
esakal May 10, 2025 09:45 AM

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

उद्या आंतरराष्ट्रीय मातृ दिन आहे. मातृदिनाच्या निमित्ताने आपण बरंच काही बोलू शकतो. आपल्या आईसाठी काही खास करू शकतो, तो दिवस ‘सेलिब्रेट’ करू शकतो... पण मग असाही विचार मनात आला, की आपण आपल्या आईकडून, तिच्या मातृत्वामधून आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी विधायक ठरेल असं काय काय शिकू शकतो?... मातृत्वाच्या अनेक शक्तींपैकी एक परिवर्तनीय शक्ती आहे ती म्हणजे करुणा (compassion). करुणा कोणत्याही आईची जणू नैसर्गिक वृत्तीच असते. पण याचा अर्थ असा नाही, की करुणा फक्त स्त्रियांमध्ये असते. आपल्या प्रत्येकात ज्या नऊ मूलभूत भावना नैसर्गिकरित्या असतात, त्यातली एक भावना म्हणजे करुणा.

या करुणामय भावनेशी जोडलं जाणं आईला सहज शक्य असतं. म्हणून करुणेचा संबंध नेहमी मातृत्वाशी अधिक जोडला जातो. या करुणेमुळेच आई आणि मुलांमधील नातं कायम जिवंत राहतं. माणूस माणसाला समजून घेतो, तेव्हा माणुसकी जिवंत राहते. त्यामुळे एक माणूस म्हणून जी एक भावना आपल्याला जोपासायला हवी आणि आपल्या आईकडून शिकायला हवी, ती आहे करुणा! करुणा आणि काळजी, या जणू नाण्याच्या दोन बाजूच.

झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत आपण अनेक गोष्टी गाठतो. यश, संपत्ती, प्रसिद्धी... पण हे सगळं मिळवताना कधी कधी एका महत्त्वाच्या मानवी गुणधर्माकडे आपलं दुर्लक्ष होतं- माणुसकीचा स्पर्श! करुणा (compassion) आणि काळजी (care) या दोन भावना केवळ नात्यांचा गुणधर्म नाहीत, तर आपल्या संपूर्ण आयुष्याचा गाभा आहेत.

करुणा म्हणजे काय?

करुणा ही केवळ सहानुभूती नाही, ती सक्रिय भावना आहे. एखाद्याच्या मनःस्थितीची, परिस्थितीची जाणीव होऊन त्याबद्दल काही तरी करण्याची प्रेरणा मनात उत्पन्न होणं म्हणजे करुणा. उदा. तुमचा सहकारी तणावात असेल, तर त्याला ‘कसा/ कशी आहेस?’ असं विचारणं, त्याला समजून घेणं, हीच करुणा.

काळजी म्हणजे काय?

काळजी ही फक्त भावना नाही; ती प्रत्येक नात्यामधली गरज आहे. कृतीतून दिसणारी आपुलकी म्हणजे काळजी.

आज करुणा आणि काळजी दुर्मीळ का वाटते?
  • आपली जीवनशैली इतकी धावपळीची झाली आहे, की दुसऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठी आपण वेळ देऊ शकत नाही.

  • समाजमाध्यमांवरील सततची तुलना, टीका आणि प्रतिक्रिया यांमुळे आपल्या असहिष्णुता वाढते.

  • भावना दाखवणं म्हणजे कमजोर असणं, अशीही एक चुकीची समजूत आहे.

करुणा, काळजी कशी आचरता येईल?
  • मिनिटभर तरी शांतपणे ऐका, फोन बाजूला ठेवा. एखाद्याचं बोलणं तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकलं, तर ती व्यक्ती नक्की काय सांगतेय, हे नीट समजेल. न बोललेल्या गोष्टीदेखील अशा वेळी समजतात. ‘मला कळतंय तू काय म्हणतेयस,’ हे एक वाक्यसुद्धा करुणेचा अनुभव देऊन जातं.

  • ‘मैं हूँ ना,’ ही भावना व्यक्त करा! कधी कधी एखाद्याला फक्त ही जाणीव हवी असते. आपण एकटे नाही, हा भाव धीर देतो. करुणा म्हणजे एखाद्याची त्या वेळेची गरज समजून घेऊन त्यावर काही तरी कृती करणं. बऱ्याचचा ती कृती धीर देणं, मानसिक आधार देणं, ही असते.

  • माफ करणं आणि समजून घेणं महत्त्वाचं. दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचार करणं ही करुणेची सुरुवात आहे. प्रत्येकाची एक कहाणी असते आणि आपण ती वाचायला शिकलं पाहिजे.

फक्त संकटं, दुःख किंवा अडचणी असताना नव्हे, तर चांगल्या काळातही करुणा दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कधी कधी ते जास्त कठीण असतं. म्हणजे पहा- एखाद्याचं आयुष्य छान चाललंय, त्याला यश मिळालंय, त्याचं नाव होतंय, त्याला हवं तसं सगळं घडतंय, यामुळेही आपल्या मनात अस्वस्थता, तुलना, गुपचूप ईष्या निर्माण होते. इथे आपल्यातील करुणेचा कस लागतो.

चांगल्या काळात करुणा दाखवणं म्हणजे यशस्वी व्यक्तीला आनंदानं दाद देणं. माझ्याही वाट्याला हे येईल, हा विश्वास मनात ठेवणं आणि शांत राहणं. इतरांचा आनंद, यश आणि भरभराट मनापासून स्वीकारणं

हे कसं करता येईल?
  • इतरांच्या आनंदात सहभागी व्हा. त्यांचं मनापासून अभिनंदन करा. एखाद्याचं लग्न, बढती, एखादं स्वप्न पूर्ण होणं, याप्रसंगी त्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी व्हा. त्या व्यक्तीला तुम्ही केलेलं कौतुक कदाचित गरजेचं वाटत नसेल; पण तरी ते करायला हरकत नसावी. त्याने तुम्ही आणखी मोठे होता!

  • एखाद्याचं यश पाहून प्रेरणा घ्यावी, तुलना करू नये. करुणाभाव आपल्याला इतरांच्या यशाबद्दल आनंदी व्हायला शिकवतो. Self-compassion- म्हणजे स्वतःबद्दलची करुणा संयमी आणि आशावादी करते. स्वतःच्या समोर असलेल्या मार्गाकडे सकारात्मकपणे बघणं हीसुद्धा करुणाच.

करुणा फक्त अश्रूंमध्ये नसते, ती हास्यातही असते. ‘वा! तू खरंच कमाल केलीस! मी तुझ्यासाठी खूप खुश आहे!’ आणि ‘काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे,’ या दोन्हीत ती आहे. दुसऱ्याचा आनंद स्वीकारणं आणि दुसऱ्याला मानसिक आधार देणं, हे दोन्ही माणुसकीचं सौंदर्य आहे.

करुणा आणि काळजी या भावना एकत्र येतात, तेव्हा नात्यांत जिवंतपणा येतो. त्या दुसऱ्याला आधार देतातच, पण स्वतःलाही शांतता आणि समाधान देतात. आजपासून तुम्हीसुद्धा कुणासाठी तरी करुणेनं विचार करा, कुणाला तरी काळजीनं ‘ठीक आहेस का?’ असं विचारा. कुणाच्या तरी आनंदात मनापासून सहभागी व्हा. जग बदलायचं असेल, तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. तीच खरी क्रांती आणि परिवर्तन!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.