सिल्लोड - तालुक्यात असलेल्या प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा उपलब्ध असून, उन्हाच्या झळा वाढत असताना टँकरची मागणीदेखील वाढू लागली आहे. उपलब्ध प्रकल्पांतील पाणीसाठ्यातूनही परिसरातील शेतकरी अवैधरीत्या पाण्याचा उपसा करीत आहे.
तालुक्यातील २३ गावांना ४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, ४१ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकंदर तालुक्यावर टंचाईचे मोठे सावट आहे.
तालुक्याची तहान भागविणाऱ्या खेळणा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आतापर्यंत अवैधरित्या परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी उपसा केला. सिंचन विभाग मात्र ठरवून याकडे कानाडोळा करतो. पाणीटंचाईची ओरड सुरू झाल्यानंतर सिंचन विभाग कारवाईचा बडगा उगारल्याचा देखावा करतो.
आता उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केल्यास तालुक्यातील पाणीटंचाई कमी होऊ शकते. कारण हाच प्रकल्प कोरडाठाक झाल्यानंतर यामध्ये चर खोदून तालुक्याची तहान काही वर्षांपूर्वी भागविण्यात आली होती.
तालुक्यातील प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा
खेळणा मध्यम प्रकल्प - १८ टक्के
अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प - १३ टक्के
केळगाव लघू प्रकल्प - ८ टक्के
उंडणगाव लघू प्रकल्प - ४ टक्के
या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
तालुक्यातील धोत्रा, वरूड खुर्द, तलवाडा, पिंप्री, केऱ्हाळा, बाभूळगाव, अंधारी, मोढा खुर्दवाडी, बनकिन्होळा, वरखेडी, टाकळी जीवरग, वडोदचाथा, गेवराई शेमी, चिंचवण, खातखेडा, पिरोळा, डोईफोडा, निल्लोड, कायगाव, म्हसला बुद्रुक, पळशी, लोणवाडी, रेलगाववाडी, बोजगाव.