Dindori Accident News : दिंडोरीत भरधाव पिकअप कारवर आदळली; महिला जखमी
esakal May 10, 2025 08:45 PM

दिंडोरी- येथील दिंडोरी- नाशिक महामार्गावरील दिंडोरी शहरात गर्दीत भरधाव पिकअपवरील ताबा सुटून ती पलटी होत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर आदळली. कारमध्ये दोन महिला बसलेल्या होत्या, मात्र सुदैवाने त्या बचावल्या. स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. ८) हा अपघात झाला.

पिकअप (एमएच १५ जेसी ७४५५) ही अवनखेड येथून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुदिना पूर्ण भरून नाशिककडे भरधाव जात होती. शहरातील बाजारपेठ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटून दिंडोरी शहरातील साईनाथ पाववडे या दुकानासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर (एमएच १५ एचजी ६३३४) पलटी होत आदळली.

कारमध्ये बसलेल्या एका महिलेला किरकोळ मार लागला. दिंडोरी शहरात सायंकाळी वाहनाची गर्दी असूनही पिकअप चालक वाहन वेगाने चालवीत होता. त्यामुळेच त्याचे पिकअपवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला.

बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने नाशिक- कळवण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनने गाडी दूर करत वाहतूक सुरळीत केली. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस तपास करीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.