आयपीएल 2025 मधील उर्वरित 16 सामने हे भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावामुळे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयने 9 मे रोजी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध एकूण 5 कसोटी मालिका खेळणार आहे. भारताच्या या दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच ‘टीम इंडिया ए’ या दरम्यान इंग्लंड लायन्स विरुद्ध 3-4 दिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती लवकरच कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे निवड समितीसमोर कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला द्यायची? हा मोठा प्रश्न असणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? कुणाला संधी मिळणार? याबाबतची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 मे रोजी टीम इंडिया ए इंग्लंडसाठी रवाना होऊ शकते. तर रविवारी 11 मे रोजी इंडिया ए टीमच्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पासपोर्टसाठी आणि इतर आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर्सी साईजसाठी लॉजिस्टिक्ससह संपर्क करण्यात आला आहे. तसेच 23 मे रोजी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते
रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची धुरा कोण सांभाळणार? निवड समिती कुणाला संधी देणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना आहेत. बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा ही पत्रकार परिषदेद्वारे केली जाऊ शकते. सध्या शुबमन गिल याचं कर्णधार म्हणून नाव आघाडीवर आहे.
दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिली मालिका असणार आहे.