Amravati News: पाकिस्तानमधून अमरावतीत धमकीचा फोन, कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Saam TV May 10, 2025 10:45 PM

भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. पाकिस्तान भारतावर सतत हल्ले करत आहे. भारताच्या सीमेलगत असलेल्या अनेक शहरांमध्ये पाकिस्तान ड्रोन, मिसाईल हल्ले आणि गोळीबार करत आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या तणावाच्या वातावरणात अनेक धमकीचे मेल आणि कॉल येत आहेत. मुंबईनंतर आता अमरावतीत धमकीचा फोन आला आहे. पाकिस्तानातून धमकीचा फोन आला. अमरावतीमध्ये कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेत. +92 च्या नंबरवरून व्हाट्सअॅपवर ४ वेळा ऑडिओ कॉल आले होते. नांदगाव पेठच्या कंपनीतील कर्मचारी आणि कारखाना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. अमरावती पोलिस याचा तपास करत आहेत.

अमरावतीच्या पोलिसांनी तात्काळ केंद्रीय गृह मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिस हायअलर्टवर आहेत. अमरावती पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आवाहन केले आहे की, अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास न उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सध्या अमरावती शहर पोलिसांची सोशल मीडिया अकाऊंटवर करडी नजर आहे.

दरम्यान, परेलमधील टाटा रुग्णालयाला शुक्रवारी धमकीचा मेल आला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती. टाटा मेमोरियल रुग्णालयाला धमकीचा मेल आल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. धमकीच्या मेलनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. संपूर्ण रुग्णालयात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. बॉम्बशोधक पथक टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल झाले होते. ज्या मेलवरून ही धमकी आली आहे त्याचा आयपी ॲड्रेस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.