बुद्ध लेण्यांनी जपला शिल्पकलेच्या अमूल्य वारसा
बुद्धपौर्णिमा विशेष; सुधागड तालुक्यात ऐतिहासिक ठेवा
अमित गवळे, पाली
सुधागड तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्ध लेण्या अनेक ठिकाणी आढळतात. ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेण्यांचा हा ऐतिहासिक ठेवा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून, धम्म, शांती आणि प्राचीन भारतीय इतिहासाची सजीव साक्ष देणारा अमूल्य वारसाही आहे.
लेण्यांमध्ये बुद्ध धर्माच्या विविध कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला आणि तत्कालीन सामाजिक-धार्मिक जीवनाचे दर्शन घडते. भिक्खूंच्या ध्यानसाधनेसाठी निर्माण केलेल्या या गुहा-विहारांमध्ये बुद्धमूर्ती, स्तूप आणि जातक कथांवर आधारित शिल्पे कोरली आहेत. प्रत्येक शिल्प, प्रत्येक कोरीव खोदकाम हे केवळ कलाकाराच्या कुशलतेचेच नव्हे, तर त्या काळच्या आध्यात्मिक समृद्धीचेही प्रतीक आहे. या लेण्या म्हणजे केवळ खडकात कोरलेली शिल्पे नसून, त्या बौद्ध धर्माच्या प्रचंड वैश्विक प्रभावाची साक्ष आहेत. वर्षभर हजारो देशी-विदेशी पर्यटक व अभ्यासक या ठिकाणी भेट देतात.
ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी समूहात चैत्यगृह, स्मारक, स्तुप समूह, सभागृह व उर्वरित २१ विहार लेण्या आहेत. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून, शयानांसाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोर दालन व चार-पाच भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था असते. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. पाच पायऱ्या असलेल्या एका विहारात रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राह्मी लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
ठाणाळे लेण्यांचा काळ हा इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. पाचव्या शतकापर्यंत आहे. ही लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तू व मोर्यकालीन चांदीची नाणी पाहाता ही लेणी २२०० वर्षांपूर्वीची असल्याचे अनुमान काढण्यात येतो. लेण्यांचा दगड अग्निजन्य (बेसाल्ट) दगड आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम असलेल्या तसेच मानवी जीवनाच्या जडणघडणीत या लेण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वाघजाई, घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळून जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराजवळ कोरण्यात आली आहेत. कोकणातून घाटमार्गे देशावर येता-जाता विश्रांतीचे स्थान म्हणून या लेण्यांचा आधार घेतला जायचा. पालीपासून ठाणाळे हे गाव १५ किमी अंतरावर असून, गावच्या पूर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणातात. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी काही काळ या ठिकाणी आश्रय घेतला होता.
नेणवली लेणी
खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नेणवली लेण्या आहेत. लेण्याचा मार्ग दोन्ही गावापासून खरबाच्या वाटेने घनदाट जंगल-डोंगरातून जातो. लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत व येथील जंगल राखीव वनक्षेत्र आहे. अतिशय दुर्गम भागात एकूण २१ लेण्या आहेत.
लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. घुमट दगडात कोरला आहे. घुमटचा व्यास १.५ मीटर उंची ३.५ मीटर आहे. घुमटाच्या वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून, चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृहे सर्वात मोठे लेणे आहे. याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. सभागृहाचे डाव्या बाजूस व मागील भिंतीत एकूण १७ खोल्या कोरल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्याचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही.
सभागृहाच्या पुढील बाजूस पाणी साठवण्याचे बंदिस्त टाके आहे. लेण्यांमध्ये काही ठिकाणी भिंतीस लागून शयन बांधले आहेत व भिंतींमध्ये कोनाडे ठेवले आहेत. एकूण ११ लेण्या असल्या तरी मुख्य सभागृह व त्याच्या बाजूकडील सदनिका वगळता काही ठिकाणी लेण्या कोसळल्या आहेत. काहींच्या भिंती तुटल्या व कोसळल्या आहेत.
चांभार लेणी
नेणवली लेण्यांच्या पश्चिम बाजूस अर्धा किलोमीटर अंतरावर चांभार लेण्या आहेत, परंतु डोंगराचे कडे तुटल्याने येथे जाता येत नाही. या लेणी समूहाचा उपयोग चौल बंदरातून नागोठणे मार्गे मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गासाठी केला आहे. ही प्राचीन लेणी १८८९ पर्यंत अपरिचितच होती, परंतु १८९० मध्ये रेव्हरंड ॲबंट यांनी लेण्यांचा प्रथम शोध लावला, मात्र तरीही लेण्यांची काहीही देखभाल-दुरुस्ती झालेली नाही.
गोमाशी लेणी
गोमाशी येथे बौद्ध लेणी समूह आहे. गोमाशी गावाजवळ सरस्वती नदीकाठी खोंडा नावाचा डोंगर आहे. डोंगरातील एका घळीत दीड मीटर उंचीची गौतम बुद्धांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. हे ठिकाण म्हणजे नागोठणे खाडीमार्गे ताम्हणी घाटात मावळात जाणाऱ्या मार्गावरील एक लेणे आहे. लेण्यांकडे जायचे असेल, तर पालीपासून गोमाशी अंतर १४ किमी आहे. गोमाशी गावापर्यंत एसटीची सोय आहे.
लेण्यांच्या संवर्धनाची गरज
अनेक देशी-विदेशी पर्यटक, इतिहाससंशोधक व बौद्ध अनुयायी लेण्या पाहण्यासाठी, अभ्यासासाठी येत असल्याने ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
- लेण्यांच्या जतनासाठी सरकारी स्तरावर योजना राबविणे.
- पर्यटकांसाठी मार्गदर्शन, माहितीफलक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- स्थानिक समुदायाला जागरूक करून लोकसहभागातून संवर्धन करणे.
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बुद्धपौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिनासारख्या विशेष प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
- सुधागड तालुक्याला ‘ध्यान पर्यटन’ (Spiritual Tourism) म्हणून प्रोत्साहन देणे.
- इतिहास आणि कलेच्या अभ्यासकांसाठी संशोधन केंद्र निर्माण करणे.