खारघर, ता. १० (बातमीदार) : बेलापूर-पेंधर मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचे रविवारपासून (ता. ११) सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रत्येक १५ मिनिटांनी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. बेलापूर-पेंधर मेट्रो मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या नियमित देखभालीकरिता, सिडकोच्या वतीने रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो सेवांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक ११ मेपासून अमलात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बेलापूर मेट्रो स्थानक आणि पेंधर मेट्रो स्थानक येथून सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो रवाना होईल; तर शेवटची मेट्रो फेरी बेलापूर मेट्रो स्थानक येथून रात्री १० वाजता व पेंधर मेट्रो स्थानक येथून रात्री ९.४५ वाजता होणार आहे. या दिवशी दर १५ मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध असणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रो सेवा उपलब्ध असणार असल्याचे सिडकोने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.