विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. ११ ः सध्या लग्नसराईचा हंगामा सुरू असून, वधू-वरांनी स्वत:च्या आयुष्याची नवीन सुरवात करावी. या हेतूने गोरस मुहूर्त काढला जातो. मात्र, डीजीच्या तालावर दोन-दोन तास चालणाऱ्या मिरवणूक, उत्साही नेतेमंडळीच्या लांबलचक आशीर्वादपर भाषणांमुळे विवाह सोहळा खोळंबून राहत असून, वऱ्हाडी मंडळीही कंटाळून काढता पाय घेऊ लागली आहेत.
मावळ तालुक्यात कोराना महामारीमुळे गेल्या चार वर्षांत साध्या पद्धतीने विवाह पार पडले. मात्र, शाही सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. वधू किंवा वर पक्षाकडून आपली ओळख कुठपर्यंत आहे. हे दाखवून देण्यासाठी तालुक्यातील नेतेमंडळींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जाते. स्वत:चा जनसंपर्क टिकविण्यासाठी नेतेमंडळीही अशा सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावत असतात. नवरदेवाच्या वरातीमुळे अगोदरच लग्नाला उशीर होत असताना नेतेमंडळींच्या भाषणवाजीमुळे आणखी विलंब होत आहे. त्यामुळे लग्नाचा गोरज मुहूर्त टळू लागला आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी अक्षता टाकण्या न टाकता मागच्या दाराने निघून जात आहेत.
मावळ तालुक्यात जमीन खरेदी विक्री व्यवहार तेजीत आल्यापासून व त्या व्यवसायामधून लाखो रुपये मिळत गेल्याने लग्नसोहळे शाही थाटात होऊ लागले आहेत. लग्नपत्रिकांतील हजारो नावे कुकुंमतिलक व हळदी समारंभास लाखो रुपये खर्च, मिरवणुकीला रथ, हत्ती, घोडे, त्यात अडीच ते तीन लाख रुपयांचा डीजेचा आवाज यामुळे लग्नसोहळे चर्चेचा विषय बनले आहेत.
मावळ तालुक्यात दरवर्षी ६०० ते ७०० लग्न समारंभ पार पडतात. त्यात दहा लाखांपासून ते एक कोटी रुपये खर्च करून मोठ्या थाटामाटात लग्नसोहळे पार पडले आहेत. काही श्रीमंत तर लग्नात आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडवत असतात. त्यांचे बघून गोरगरीब व मध्यमवर्गीय कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे विवाह थाटामाटात करू लागले आहेत. गोरगरीब कुटुंबीयांचा लग्नाचा खर्च वाचावा, यासाठी तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले. त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबीयांना त्याचा फायदाही होत आहे. लग्नसोहळ्यातील अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी अनेक मंडळींनी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही.
वऱ्हाडीमंडळींचा मागच्या दाराने काढता पाय
सध्या दोन ते तीन तास लग्नाला उशीर होत असल्याने लग्न सोहळेसाठी आलेले वऱ्हाडी मंडळी मंडपात जातात. व्यासपीठावर असलेला निवेदक नाव पुकारून आलेल्यांचे स्वागत करतो. नाव पुकारले नंतर लग्नाला आलेली व्यक्ती अक्षता न टाकताच मागण्याच्या दाराने निघून जातो.
(लग्न सोहळे वेळेनुसारच मुहूर्तावर व्हायला हवेत.दोन दोन तास लग्न उशिराने लागत असल्यामुळे गोरस मुहूर्त टळत आहे.त्यामुळे व-हाडी मंडळी देखील वैतागून निघून जातात. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे.
गणेश महाराज जांभळे
कीर्तनकार, अध्यक्ष श्री विठ्ठल परिवार मावळ)
(लग्न सोहळा शुभवेळेवर व्हावा म्हणूनच गोरस मुहूर्त काढला जातो.मात्र त्याचे महत्त्व सध्या कमी होऊ लागले आहे. संयोजकांनी वेळेच भान ठेवून वेळेतच लग्न कशी लागतील यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
विश्वास भिडे
पुरोहित वडगाव मावळ)