Rahul Gandhi : संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलवा, राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
esakal May 12, 2025 09:45 AM

नवी दिल्ली : पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यानंतर हाती घेण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर आणि नुकताच झालेला शस्त्रसंधी करार या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत केली आहे. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जावे, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी सामील झाले तरच विरोधकांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असा सल्ला दिला आहे.

‘‘पहलगामचा दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी करारावर चर्चा करणे जनतेसाठी आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींसाठी आवश्यक बनले आहे. विशेष म्हणजे शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सर्वात आधी करण्यात आली होती. आगामी काळातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची संधी विशेष अधिवेशनामुळे मिळू शकते. त्यामुळे या गंभीर मुद्द्यावर आपण विचार कराल आणि लवकरच अधिवेशन बोलवाल,’’ असा विश्वास असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.

खर्गे यांचेही पत्र

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशाच आशयाचे पत्र मोदी यांना लिहिले आहे. दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आम्ही २८ एप्रिल रोजी केली होती. आता ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पडले आहे आणि शस्त्रसंधीदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे तमाम विरोधी पक्षांच्या वतीने अधिवेशन घेण्याचे मागणी मी आपल्याकडे करत आहे, असे खर्गे यांनी पत्रात म्हटले आहे. तिकडे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेत एकूण घडामोडींवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. ‘‘पंतप्रधान सहभागी झाले तरच सर्व विरोधी पक्षांनी यात सहभागी व्हावे,’’ असा सल्लाही त्यांनी दिला. १२ मे रोजी पाकसोबत काय चर्चा होणार आहे, याची आम्हाला माहिती नाही, असे सिब्बल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.