पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, काही ठिकाणी वाहतूक कोंडी मॅन्युअली सोडवणं शक्य नसते. पावसाळा सुरू होत आहे. त्यासाठी ट्राफिक मॅनेजमेंट गरजेचे आहे. गेल्या वर्षी आपण पाऊस येण्याअगोदर तयार नव्हतो असे दिसले होते. गेले वेळी पोलीस नियोजन नव्हते, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आता पाऊस झाला की पहिल्यांदा ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजे. त्यामुळे लोक बिंदास होतात. रात्री अपरात्री कधीही आपण अलर्ट व्हायला हवं. गेले वेळी काही स्पॉटवर पाणी भरले होते. कुठे रस्ते खराब होते. पाणी आडते अशा ठिकाणी तयार राहा. पावसाळाअगोदर पुणे महानगरपालिका आणि पुणे वाहतूक पोलीस याचे वाहतुकीबाबत मॉक ड्रील करा. याबाबत महापालिकेच्या मागे लागून काम करू घ्या, अशा सुचना त्यांनी केल्या आहेत.
ते म्हणाले की, पाऊस सुरू होण्याअगोदर खड्डे असतील तर ते महपालिका कळवून ते खड्डे बुजवून घ्या. प्रामाणिकपणे मेहनतीने इमानदारीने आपण रस्त्यावर काम केले. वाघोली रस्त्यावर डंपर खुले चालतात. रस्त्यावर दारू पिऊन गाडी चालवतात. यामध्ये दोन अपघात झाले. त्यात मृत्यू झाला. हे कसं चालतं? एका राजकीय नातेवाईकांची गाडी आहे. तुमचे जे ऐकत नाही त्यांच्यावर कारवाई करा. डंपर, लक्झरी कुठून येऊ द्या कारवाई करा. कारणे देऊ नका. म्हणून एका अधिकाऱ्याला बदली केली.डोळे बंद करून त्यांना जाऊ देऊ नका. गाड्या जप्त करा, असे थेट कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांना आग्रह आणि विनंती आहे. वाहतूक सुरळीत होणं गरजेचे आहे. दोन्ही बाजूला पाय ठेवू नका. तुम्ही बुडाल. लपून छापून कारवाई करू नका. जी कारवाई करायची आहे ती बिंदास करा. रस्त्यावर तुम्ही पारदर्शक रहा. तशी कारवाई करा. पुणे शहरात हिस्टोरिक रस्ते आहेत. जैन रोड, फर्ग्युसन रोड, एम जी रोड यावर फेरीवाले आहेत. त्यांच्यावर पण कारवाई केली होती. आपण अजून करू. बार दुकानाच्या बाहेर जर गाड्या पार्किंग दिसल्या तर बार तीन दिवस बंद ठेवायला सांगा, अशा कडक सुचना त्यांनी केल्या आहेत.