नवी दिल्ली : ‘‘भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची धग केवळ सीमेजवळील पाकिस्तान सैन्याच्या लष्करी तळांवर जाणवली नाही, तर ती रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली,’’ असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचे जीव घेणाऱ्या भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने धडा शिकवला आहे, असेही राजनाथ म्हणाले.
लखनौमधील ब्राह्मोस निर्मिती केंद्राचे उद्घाटन राजनाथ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. त्या वेळी राजनाथ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्कराची कारवाई नाही, तर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सामरिक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.
सिंह म्हणाले, ‘‘संपूर्ण देश भारतीय लष्कराचे अभिनंदन करीत असून, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत समाधान व्यक्त करीत आहे. ही मोहीम दहशतवादाविरुद्ध भारताच्या तीव्र इच्छेचे प्रदर्शन आहे आणि सैन्य दलांची क्षमता आणि निश्चय आणखी दृढ होत आहे. जेव्हा जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध काही कारवाई करतो, तेव्हा अतिशय आक्रमक भूमिका घेतली जाते. सीमेपलीकडील जमीन दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांसाठी सुरक्षित राहणार नाही, हेच आपण दाखवून दिले आहे. दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधील तळ उद्ध्वस्त करण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात आली.’’
‘‘भारताने या संपूर्ण कालावधीमध्ये कधीही तेथील नागरिकांवर हल्ला केला नाही, उलट पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर हल्ले केले; तसेच मंदिर, गुरुद्वारा, चर्च यांनाही लक्ष्य केले. भारतीय सैन्याने शौर्य व धैर्य तसेच संयम दाखविला आहे आणि पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करून योग्य उत्तर दिले आहे. भारतीय सैन्य दलांचे शौर्य केवळ सीमेवरील चौक्यांपर्यंत मर्यादित नव्हते, तर त्यांच्या
कारवाईची धग पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत दिसली. संपूर्ण जगाने भारतातील दहशतवादी घटना पाहिली आणि त्याचे परिणामही पाहिले. उरीच्या घटनेनंतर भारतीय
लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट येथे ‘एअर स्ट्राइक’ करण्यात आला आता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला,’’ असे ते म्हणाले.
‘ब्राह्मोसच्या शौर्याची झलक दिसली’लखनौ : ‘‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या शौर्याची एक झलक दिसून आली,’’ असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून, त्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले. ब्राह्मोस निर्मिती केंद्राच्या उद्धाटनावेळी योगी बोलत होते. ‘‘जगाला या क्षेपणास्त्राची एक झलक ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने दिसली आहे. समजा ही ताकद दिसली नसेल, तर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला विचारा तो नक्की सांगेल,’’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण घेण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने घेतली. हा नवा भारत आहे. त्यात दहशतवादाविरुद्ध सीमेवर आणि सीमेपलीकडेही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादाविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री