विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. 14 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. त्याचा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या घोषणेनं चाहते आणि क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. अशातच विमानतळावरील त्याचा व्हिडीओ पाहून काही नेटकरी भावूकसुद्धा झाले आहेत.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये विराट खूप खुश दिसत आहे. पत्नी अनुष्का शर्माच्या खांद्यावर हात ठेवून तो आनंदाने जात असल्याचं पहायला मिळत आहे. पापाराझींना पाहताच त्याने त्यांना हॅलो केलं आणि त्यानंतर दोघं निघून गेले. या व्हिडीओ नेटकऱ्यांनी कमेंट करत विचारलंय की, ‘विराट आता देश सोडून जात आहे का?’ एकीकडे विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर दुसरीकडे अनुष्कासुद्धा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. त्यामुळे आता दोघं कायमचे परदेशात स्थायिक होणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ‘वहिनी जरा थांबा.. विराट दादालाही थांबवा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘गाडीत बसून तुम्ही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि आता थेट निघून जात आहात का’, असं दुसऱ्याने विचारलंय.
गेल्या काही वर्षांपासून विराट आणि अनुष्का हे परदेशात राहत आहेत. तर कामानिमित्त दोघं भारतात येतात. वामिका आणि अकाय या दोन मुलांसोबत हे दोघं लंडनला स्थलांतरित झाल्याचंही म्हटलं गेलंय. काही दिवसांपूर्वी विराट त्याच्या सोशल मीडियामुळेही चर्चेत होता. विराटच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजवरील फोटो लाइक झाला होता. त्यानंतर त्याने स्पष्टीकरण देत इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमुळे असं झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विराट आणि अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये विराट गाडीमधून उतरणाऱ्या अनुष्काच्या मदतीसाठी त्याचा हात पुढे करतो. परंतु अनुष्का त्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून जाते. अवनीत कौरच्या प्रकरणानंतर अनुष्का त्याच्यावर रागावल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी यावरून वर्तवला होता.