'दोघांपैकी एक जण तरी वाचायला हवं होतं', पाकिस्तानच्या हल्ल्यात जुळी मुलं गमावलेल्या कुटुंबाचा टाहो
BBC Marathi May 13, 2025 05:45 AM
MARIA KHAN मारियाची बहीण उरुसा आणि मेहुणे रमीज त्यांच्या मुलांसह

मागील आठवडा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळं तणावपूर्ण राहिला.

भारताने पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणे आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यामुळं जम्मू-काश्मीरमधील सीमेवरील भागात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण होते.

रात्रभर मोर्टार आणि तोफ गोळांचा या भागात वर्षाव सुरू होता. या हल्ल्यात काही सामान्य नागरिकही दगावले. ज्यात पुंछमधील जुळ्या भावंडांचाही मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरच्या पुंछ शहरात राहणाऱ्या झैन अली आणि उर्वा फातिमा यांच्यासाठी 6 मे हा दिवस इतर दिवसांसारखाच सामान्य दिवस होता.

हे बारा वर्षांचे जुळे भाऊ-बहीण शाळेत गेले, गृहपाठ केला, थोडंसं खेळले, रात्रीचं जेवण केलं आणि नंतर झोपी गेले.

परंतु, मध्यरात्री त्यांची झोपमोड झाली. याचं कारण होतं, त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील (एलओसी) गोळीबार.

झैन आणि उर्वाची मावशी मारिया खान हे मला सांगत होत्या. त्यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. त्या रडत होत्या.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलंय आणि पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देत आहे, याची मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना माहिती नव्हती.

भयभीत आणि घाबरलेले ते लोक गोळीबार थांबण्याची वाट पाहत होते. सकाळ झाली.

अखेर साडेसहाच्या सुमारास मुलांचे मामा त्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना तिथून बाहेर काढण्यासाठी आले. त्यांनी फोन करून त्यांना घराबाहेर बोलावलं.

Getty Images इथंच बारा वर्षांचे जुळे भाऊ-बहीण झैन अली आणि उर्वा फातिमा यांना दफन करण्यात आलं आहे.

जड आवाजात मारिया म्हणाल्या, "दीदीने उर्वाचा हात धरला होता आणि जीजूंनी झैनचा हात धरला होता. ते घरातून बाहेर आले आणि अचानक बॉम्बचा स्फोट झाला. उर्वाचा तिथेच मृत्यू झाला आणि झैन कुठं पडला ते कळलं देखील नाही."

उर्वाची आई आवाज देत होती, ती घाबरली होती. त्याच अवस्थेत ती सर्वांना शोधत होती. अखेर तिने पाहिलं की दूर एका अनोळखी व्यक्ती झैनच्या छातीवर दाब देत त्याचा श्वास पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला यश आलं नाही.

याच दरम्यान, झैन आणि उर्वाचे वडील रमीझ खान अर्धा तास रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले होते.

रमीझ गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुंछ येथील रुग्णालयात दाखल करून, उरुसा आपल्या भावासोबत परत घरी गेल्या.

त्यांना आपल्या मुलांचे दफन करायचं होतं.

शाळेला केलं टार्गेट?

मारियांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी त्यांची जम्मूच्या जनरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.

गेल्या चार दिवसांत पूंछ आणि जम्मू येथील हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सुमारे वीस जणांना येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी फक्त दोघेच आयसीयूमध्ये आहेत - मारियाची बहीण उरुसा आणि मेव्हणे रमीझ.

रमीझ खान यांना त्यांची दोन्ही मुलं या जगात नाहीत, हे अद्याप माहीत नाही. जीवन आणि मृत्यूशी लढत असलेल्या रमीझ यांना त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का द्यायचा नाही.

Getty Images पाकिस्तानी गोळीबारामुळे घराबाहेर पडताच बॉम्बस्फोट झाला ती जागा.

मारिया म्हणतात, "दीदी जखमी पण आहे आणि ती मुलं गमावल्याचं दुःखही सहन करत आहे. ना ती झोपत आहे, ना काही खात आहे, ना नीट बोलत आहे. तिला फक्त दोन मुलं होती, ती दोन्हीही गेली आहेत."

उरुसा आणि रमीझ यांची मुलं त्यांच्या आयुष्याचा कणा होते. एका सरकारी शाळेत शिक्षक असलेले रमीझ, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ इच्छित होते.

त्यासाठी त्यांनी एक वर्षांपूर्वी मुलांच्या शाळेनजीक राहण्यासाठी एक घर भाड्यानं घेतलं होतं.

कदाचित शाळेची जवळीकच मुलांच्या मृत्यूचे कारण ठरली असेल, असं मारियांना वाटतं.

Getty Images भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही उर्वा आणि झैनच्या मृत्यूचा उल्लेख केला होता.

दि. 9 मे रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना एका पत्रकाराने पाकिस्तानने शाळांना लक्ष्य केल्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी या हल्ल्याचा उल्लेख केला होता.

मिस्री यांनी म्हटलं, "नियंत्रण रेषेवर होणाऱ्या जोरदार गोळीबारादरम्यान एक शेल पुंछ शहरातील क्राइस्ट शाळेच्या मागे पडला आणि शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांच्या घराजवळ त्याचा स्फोट झाला. दुर्दैवाने यामध्ये त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आणि त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले."

ऑपरेशन सिंदूरवर करण्यात आलेल्या या दुसऱ्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी हेही सांगितलं की, 7 मे रोजी सकाळी पुंछमध्ये पाकिस्तानच्या प्रत्युत्तराची कारवाई सर्वात जास्त प्राणघातक होती. यात लहान मुलांसह 16 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला.

सीमाभागातील लोकांना कोणताही इशारा देण्यात आला नव्हता

रमीझ यांच्या जखमा गंभीर होत्या. कुटुंबानं त्यांना उपचारासाठी आधी पुंछमधील रुग्णालयात आणलं. नंतर तेथून चार तासांच्या अंतरावर असलेल्या राजौरी शहराच्या रुग्णालयात नेलं.

त्यानंतर तिथून आणखी चार तासांचा प्रवास करून जम्मूच्या मोठ्या रुग्णालयात नेलं. याच धावपळीच्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष विराम जाहीर करण्यात आला. हल्ले थांबले, पण रमीझ आणि उरुसा यांच्यासाठी मात्र याला खूप उशीर झाला होता.

MARIA KHAN पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली जुळी भावंडं झैन अली आणि उर्वा फातिमा

मारिया म्हणाल्या, "युद्ध असो, युद्धविराम असो, आमची मुलं आता परत येणार नाहीत."

त्या नजर वर करतात आणि मला पाहतात आणि विचारतात, "जर देशाच्या सुरक्षेसाठी युद्ध आवश्यक असेल, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे आवश्यक असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. पहलगाम हल्ल्याने आम्हालाही दुःख झालं आहे, पण सीमेजवळ राहणाऱ्यांच्या आयुष्याचाही विचार करायला हवा. आम्ही माणसं नाही का?"

सीमेजवळ असणाऱ्या गावांमध्ये सरकारने बंकर बनवले आहे. परंतु, पुंछ शहरात अशी सुविधा नाही.

मारिया यांच्या मते, ऑपरेशन सिंदूरपूर्वी सरकारने सीमावर्ती भागातील लोकांना माहिती द्यायला हवी होती. आम्ही तिथून सुरक्षित जागी गेलो असतो आणि, "कदाचित आमची मुलं आज आमच्याजवळ असली असती."

Getty Images जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी रूग्णालयात जाऊन जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी रूग्णालयात जाऊन जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते आयसीयूतही गेले होते.

हल्ल्यात मृत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

मारिया या त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल विचार करायला घाबरत आहेत.

रमीझ खान रोज आपल्या मुलांबाबत सातत्यानं चौकशी करत आहेत.

त्या म्हणतात, "दोघांपैकी कुणी एक तरी वाचलं असतं, दीदी कशी जगणार, जीजाजींना कसं सांगणार?

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.