भारतात जायचं की नाही जायचं.., IPL 2025 बाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची थेट भूमिका
GH News May 13, 2025 02:10 PM

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित एकूण 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 17 मे पासून या हंगामाला सुरुवात होणार आहे. एकूण 5 शहरांमध्ये हे उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतावादी हल्ल्याचा’ऑपरेशन सिंदूर’द्वारे बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कुरापती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढवा. त्यामुळे बीसीसीआयने सुरक्षिततेच्या कारणामुळे 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा मोसम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. मात्र आता पुन्हा या हंगामात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेजारी देशांमधील तणावाच्या स्थितीनंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले होते. आता ते उर्वरित सामन्यांसाठी परतणार की नाहीत? याबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका जाहीर केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका काय?

“खेळाडूंना भारतात परतायचे की नाही? या त्यांच्या वैयक्तिक निर्णयात क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांना पाठिंबा असणार आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यासाठी इच्छूक असणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी टीम मॅनेजमेंट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करेल. सुरक्षा व्यवस्थेबाबत आम्ही ऑस्ट्रेलिया सरकार आणि बीसीसीआयशी सतत संपर्कात आहोत”, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने फुल्ल सपोर्ट दिला आहे.

पंजाब किंग्स टीममध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक खेळाडू आहेत. तसेच पंजाब व्यतिरिक्त, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्ल्ससाठी खेळताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंचा उर्वरित आयपीएलच्या हंगामात खेळण्याचा किंवा न खेळण्याचा निर्णय हा निर्णायक ठरणार आहे.

2 खेळाडूंचा स्पष्ट नकार

जोश हेझलवूड याला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतता येणार नाही, हे स्पष्ट आहे. हेझलवूड याने याबाबत आधीच टीम मॅनेजमेंटला सांगितलं आहे. हेझलवूडने आरसीबीचं प्रतिनिधित्व करत होता. तसेच दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यानेही नकार दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.